Women's World Cup 2022, IND vs ENG: भारतीय महिला संघाचा आतापर्यंत वन डे विश्वचषकातील प्रवास दमदार सुरू होता. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला तर तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. न्यूझीलंडच्या संघाकडून भारताला पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर आजही इंग्लंडने भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ३६.२ षटकात १३४ धावा केल्या. इंग्लंडने ३२व्या षटकात ६ गडी राखून आव्हान पार केलं. या सामन्यात एक अतिशय विचित्र गोष्ट घडली.
अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी ही बॉलिंग करत होती. पाचव्या षटकात तिने चेंडू टाकला. फलंदाजाने चेंडू खेळताना बचावात्मक फटका खेळला. चेंडू रोखणं फलंदाजाला तितकं शक्य झालं नाही. त्यामुळे चेंडू बॅटला लागून थेट स्टंपच्या दिशेने गेला, पण त्यानंतर जे झालं ते पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. चेंडू जाऊन स्टंपला चिकटला. पण स्टंपवरील बेल्स खाली पडली नाही. त्यामुळे नशिब बलवत्तर असल्याने फलंदाज नाबादच राहिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. पाहा हा अजब गजब व्हिडीओ...
झूलन गोस्वामीचा भीमपराक्रम!
भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिने आपल्या वन डे कारकिर्दीतील २५० विकेट्सचा टप्पा आजच्या सामन्यात पूर्ण केला. टॅमसीन ब्युमॉन्ट हिला तिने एका धावेवर माघारी धाडलं. झूलनने तिला पायचीत पकडले आणि आपला अडीचशे बळींचा टप्पा गाठला. असा कारनामा करणारी झूलन एकमेव महिला क्रिकेटर आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासात इतर कोणाला २०० बळींचा टप्पाही गाठता आलेला नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कॅथरिन फिट्झपॅट्रीक हिच्या नावे १८० बळी आहेत.
भारताचा स्पर्धेतील दुसरा पराभव, इंग्लंडचा पहिला विजय
भारतीय संघाने ४ पैकी आज दुसरा सामना गमावला. भारताने प्रथम फलंदाजी करताना स्मृती मानधना (३५) आणि रिचा घोष (३३) यांच्या छोटेखानी खेळींच्या बळावर कशाबशा १३४ धावा केल्या. चार्ली डिनने २३ चेंडूत ४ बळी टिपले. इंग्लंडने हे आव्हान ६ गडी राखून पूर्ण केलं. कर्णधार हेदर नाईट (५३*) आणि नॅट स्कायव्हर (४५) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. याआधीच्या तिनही सामन्यात इंग्लंड पराभूत झालं होतं.