Hardik Pandya Toss Video, IPL 2022 GT vs PBKS: पंजाब किंग्ज संघाविरोधात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १४३ धावा केल्या. हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर, शुबमन गिल, राहुल तेवातिया या भरवशाच्या फलंदाजांनी निराशा केली, पण नवख्या साई सुदर्शनचे नाबाद अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने ही धावसंख्या उभारली. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकली. त्याच वेळी एक अतिशय मजेशीर किस्सा घडला.
हार्दिक पांड्याने टॉसच्या आधी असंच नाणं उडवलं. त्यानंतर मूळ टॉसच्या वेळी हार्दिक पांड्याने खूप उंच टॉस उडवला. त्यावेळी पंजाब किंग्जच्या मयंक अग्रवालने जे उत्तर दिलं, ते योग्य नव्हतं. त्यामुळे हार्दिकने नाणेफेक जिंकली. त्यावेळी हार्दिक अतिशय आनंदी होऊन ओरडू लागला. एखादी विकेट मिळावी किंवा सामना जिंकावा अशाच प्रकारे हार्दिकने कल्ला केला. त्यानंतर मयंक आणि हार्दिक दोघेही हसू लागले.
दरम्यान, गुजरातच्या डावात सलामीवीर शुबमन गिल ९ धावांवर बाद झाला. वृद्धिमान साहाने चांगली सुरूवात केली, पण तो १७ चेंडूत २१ धावांवर माघारी परतला. कर्णधार हार्दिक पांड्या एक धावेवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया दोघेही प्रत्येकी ११ धावांवर बाद झाले. पाठोपाठ प्रदीप सांगवान (२), लॉकी फर्ग्युसन (५), अल्झारी जोसेफ (४) यांना फारशी चमक दाखवता आली नाही. वरच्या फळीतील साई सुदर्शनने दमदार अर्धशतक ठोकले. ५० चेंडूत त्याने ५ चौकार आणि एक षटकारासह ६५ धावा केल्या. त्यामुळे गुजरातला १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.