IND vs SA 2nd ODI Video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी रांचीमध्ये दुसरा एकदिवसीय सामना खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) आफ्रिकेवर विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. इशान किशन (Ishan Kishan) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या १५५ चेंडूंत १६१ धावांच्या भागीदारीमुळे भारताला विजय मिळवता आला. श्रेयस अय्यरने नाबाद ११३ धावा केल्या. तर इशान किशनचे (९३) शतक थोडक्यात हुकले. या सामन्याच्या नाणेफेकीच्या (Toss) वेळी एक अजब गोष्ट घडली.
भारताने सामन्यात नाणेफेक हरली आणि भारताला प्रथम गोलंदाजी करावी लागली. नाणेफेकीच्या वेळीच या सामन्यात एक विचित्र घटना पाहायला मिळाली. ही घटना जरी विचित्र असली तरी त्याने साऱ्यांना हसायला लावले. सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करत असलेला केशव महाराज नाणेफेकसाठी पोहोचले. समालोचक मुरली कार्तिक आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ देखील तेथे होते. जेव्हा नाणेफेक करण्याची वेळ आली तेव्हा मुरली कार्तिकने नाणे कोणाकडे आहे असे विचारले. त्यानंतर काही काळ सगळेच एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले, तेव्हा जवागल श्रीनाथ हसले आणि त्यानंतर जवागल श्रीनाथने खिशातून नाणे काढून कॅप्टनला दिले. नाणेफेकीसाठी मॅच रेफरी जवागल श्रीनाथ वेळी कर्णधारांना नाणे द्यायलाच विसरले होते. या घटनेमुळे सारेच हसायला लागले. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, भारतीय संघाने पहिला सामना गमावल्यानंतर, दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत असताना २७८ धावा केल्या. एडन मार्करमने ७९ तर रीझा हेंड्रीक्सने ७४ धावांची खेळी केली. या दोघांनी १२९ धावांची भागीदारीही केली. त्यानंतरच्या फलंदाजांनी मोठी खेळी न केल्याने आफ्रिकेला तीनशेपार आकडा गाठता आला नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन (१३) आणि शुबमन गिल (२८) हे झटपट माघारी परतले. त्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यर जोडीने सामना भारताच्या दिशेने फिरवला. किशन बाद झाला पण अय्यरने नाबाद राहत भारताला विजय मिळवून दिला.