संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या एका क्रिकेट सामन्याचे हैराण करणारे फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फुटेज व्हायरल झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या सामन्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयसीसी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग या सामन्याची सखोल चौकशी करत आहे. टी-20 अजमन ऑल स्टार लीगमधील एका सामन्याचे हे फुटेज आहेत. या लीगमधील हा चौथा सामना होता.
24 जानेवारी रोजी दुबई स्टार्स आणि शारजाह वॉरियर्स यांच्यात हा सामना झाला होता. या व्हिडीओमध्ये फलंदाज अक्षरशः आपल्या विकेट 'फेकत' असल्याचं दिसतंय. अत्यंत वेंधळेपणातून किंवा अगदी जाणूनबुजून फलंदाज या व्हिडीओत बाद होताना दिसत आहेत.
शारजाह वॉरियर्सने 20 षटकांमध्ये 136 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करणा-या दुबई स्टारचे फलंदाज जाणूनबुजून आपल्या विकेट 'फेकत' असल्याचं दिसलं. केवळ 46 धावांमध्ये दुबई स्टारचा संघ ऑल आउट झाला. विशेष म्हणजे त्यांचे पाच फलंदाज धावचीत आणि यष्टिचित झाल्याने शंका उपस्थित होत आहे.
आयसीसी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच युएईमध्ये झालेल्या अजमन ऑल स्टार्स लीगच्या मॅचची चौकशी सुरू आहे अशी माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटचे मॅनेजर एलेक्स मार्शल यांनी दिली. सामन्याशी निगडीत खेळाडू आणि अधिका-यांची चौकशी सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. मात्र, चौकशीबाबत संपूर्ण माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
पाहा व्हिडीओ -