Join us  

'स्टार असल्यानेच धोनीवर टीका'

वन डे मालिकेनंतर सर्वाधिक चर्चा आणि वाद रंगलेत ते महेंद्रसिंह धोनी याच्यावर.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:47 PM

Open in App

वनडे मालिका संपली. आता १ आॅगस्टपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका सुरू होतेय. वन डे मालिकेनंतर सर्वाधिक चर्चा आणि वाद रंगलेत ते महेंद्रसिंह धोनी याच्यावर. धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे तो कसोटी दौऱ्यात नसणार. अशात तो आगामी म्हणजे पुढील वर्षी होणारा वर्ल्डकप खेळणार? तो संघात स्थान मिळवणार? असा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. माझ्या मते, याचे उत्तर लवकरात लवकर द्यायला हवे; कारण वर्ल्ड कप सुरू होण्याच्या एक-दोन महिन्यांपर्यंत हे उत्तर रोखून ठेवणे योग्य नाही. नुकत्याच झालेल्या वन डे मालिकेत असे वाटत होते की, धोनी आपल्या बेस्ट फॉर्ममध्ये नाही. त्याने खूप संघर्ष केला. जेव्हा ३०० धावांचे लक्ष्य होते तेव्हा या धावसंख्येपर्यंत संघ पोहोचू शकला नाही. तिसºया वन डेत धोनीने धावांसाठी संघर्ष केला. माझ्या मते, दुसरा आणि तिसरा सामना यात खूप फरक होता. याची तुलना केली जाऊ शकत नाही. जेथे फिटनेसचा प्रश्न आहे, त्यात धोनीशिवाय इतर खेळाडू सर्वाधिक फिट असेल असे मला वाटत नाही. हार्दिक पांड्या आणि विराट कोहली सोडले तर धोनीसुद्धा खूप फिट आहे. मालिकेत धोनीचा फॉर्म खराब होता, असे म्हणणे चुकीचे होईल; कारण त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या आहेत. शिखर धवनने चांगल्या धावा केल्या; मात्र त्याला एकही अर्धशतक करता आले नाही. ४०-४२ धावा काढून तो बाद होत होता. सुरेश रैनाला संधी मिळाली; मात्र तोसुद्धा विशेष काही करू शकला नाही. राहुलने एक टी-२० शतक ठोकले. दिनेश कार्तिकही प्रभाव टाकू शकला नाही. त्यामुळे धोनी अपयशी ठरला हे म्हणणे चुकीचे आहे; कारण सातत्यपूर्ण अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे. त्याच्यावर टीका होतेय ती केवळ तो ‘धोनी’ असल्यामुळेच. तो स्टार आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्वांच्या नजरा मायक्रोस्कोपसारख्या होत्या. जे कुणी समीक्षक, टीकाकार किंवा चाहते असतील ते ३७ वर्षीय धोनीची तुलना २५-२६ वर्षीय धोनीशी करतात. जो धोनी १० वर्र्षांपूर्वी खेळत होता, तसा तो आताही खेळावा, अशी त्यांची अपेक्षा असते. असे होऊ शकत नाही;कारण प्रत्येक क्रिकेटपटूचा एक काळ असतो. वय वाढलं की खेळाडू स्वत:ला अ‍ॅडजस्ट करत असतो. धोनीसुद्धा तेच करतोय. पुढील वर्षी धोनी ३८ वर्षांचा होईल. त्यामुळे तो विश्वचषकात स्थान मिळवेल की वय त्याच्याविरुद्ध जाईल? असा प्रश्न आहे; पण तुम्ही जर वर्ल्ड कपचा इतिहास पाहिला तर काही आश्चर्याच्या गोष्टी लक्षात येतील. १९७५ मध्ये पहिला वर्ल्ड कप जो वेस्ट इंडिजने जिंकला होता, ज्यात क्लाईव्ह लॉईडने शतक ठोकले होते; पण त्याला साथ दिली ती ३९ वर्षीय रोहन कन्हाय याने. त्याच्या अर्धशतकामुळे विंडीज संघ जिंकला होता. नाहीतर ते पराभूत झाले असते.१९७९ मध्ये इंग्लंड संघ फायनलमध्ये पोहोचला होता. त्यांचे दोन मोठे खेळाडू होते. ज्येफ बॉयकॉट आणि माईक ब्र्रेअर्ली हे दोघेही ३७-३८ वर्षांचे होते. या दोघांचे योगदानच महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतर १९९१ मध्ये सेमीफायनल आणि फायनलमध्ये ३९ वर्षीय इम्रान खाने स्वत:ला प्रमोट केले होते. ३५ वर्षीय जावेद मियांदादने उत्कृष्ट प्रदर्शन केले. २०११ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वविजेता ठरला. त्यातही ३८ वर्षीय सचिन तेंडुलकरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे अनुभव महत्त्वाचा आहे, वय नाही. मात्र, प्रत्येक सामना त्यानेच जिंकून द्यावा, असेही नाही; पण त्याच्या जागी दुसरा पर्यायी खेळाडू आहे का? जो फलंदाजी आणि यष्टिरक्षकही असेल. असेल तर निवडकर्त्यांना धोनीचा रोल ठरवावा लागेल.यष्टिरक्षकाचा पेच...कसोटी मालिकेत धोनी नाही. त्यामुळे यष्टिरक्षक कोण, यावर चर्चा झाली. त्यातच भारत ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले की, संघात निवड झालेला ऋषभ पंत हा चांगला पर्याय ठरू शकतो.तो कसोटी सामन्यांसाठी तयार आहे. पार्थिव पटेलच्या जागी दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की कार्तिक यष्टिरक्षक असेल की पंत? पंतजवळ जास्त अनुभव नाही. तो २०-२२ वर्षांचा आहे.कार्तिककडे अनुभव आहे. पंत हा डावखुरा फलंदाज आहे. त्यामुळे त्याची मदत होईल. मात्र, कुणाला संधी मिळणार हे १ आॅगस्टला स्पष्ट होईल.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीक्रिकेट