तिरुअनंतपुरम : राजकोटमध्ये शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नव्हता. त्यावरून धोनीला पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटूंनी लक्ष्य केलं आहे. काही माजी खेळाडू धोनीच्या समर्थनार्थ तर काहीजणांनी त्याने आता निवृत्ती घ्यावी असे मत मांडले आहे. माजी खेळाडू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि अजित आगरकरने धोनीला लक्ष्य करत युवा खेळाडूंना संधी द्यावी असं म्हटलं असताना माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग आणि भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने धोनीच्या समर्थनात भूमिका मांडली आहे.
भारतीय संघ आज (मंगळवारी) न्यूझीलंडविरुद्ध तिस-या व निर्णायक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मालिका विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. या लढतीत महेंद्रसिंह धोनीच्या फलंदाजी क्रमावर सर्वांची नजर राहणार आहे. कारण धोनीच्या संघातील स्थानावरुन माजी खेळाडूंमध्ये मतमतांतरे असल्याचे पहायला मिळतेय. धोनीच्या संघातील जागेवरुन क्रिकेट विश्वात सध्या दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. धोनीच्या खेळाबाबत टीममधील कोणत्याही सदस्याला अजिबात शंका नाहीये. जे लोक धोनीच्या प्रदर्शनावर आणि त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांनी एकदा धोनीच्या विक्रमावर नजर मारावी असा सल्ला भुवनेश्वरने धोनीच्या टीकाकारांना दिला आहे. सोमवारी सराव संपल्यानंतर भुवनेश्वर बोलत होता.मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना धोनीने पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजीला सुरूवात करावी. संघ व्यवस्थापनाने याविषयी त्याला सांगावे. धोनी योग्य वेळी निवृत्ती घेईल आणि कधीच कोणत्याही युवा खेळाडूचा रस्ता अडवणार नाही. असे मत भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने मांडले आहे.