मुंबई: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकांसह विविध पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. तसेच अर्ज करण्याची मुदत देखील संपल्याने कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीमध्ये कपिल देव यांच्याशिवाय माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी आहेत.
मात्र बीसीसीआय नव्या नियमानुसार समिती प्रशिक्षकाची निवड करणार का? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे संघ प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच नवा वाद उभा राहिला आहे. त्यामुळे समितीमधील सदस्य इतर पदावर असल्याने निवड प्रक्रियेत अडचण येईल अशी चर्चा होत आहे.
कपिल देव भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या समितीचे सदस्य आहेत. अंशुमन गायकवाड यांच्यासोबत टीव्हीवर विशेषज्ञ म्हणून काम पाहतात. याशिवाय गायकवाड बीसीसीआयच्या समितीचे सहकारी आहेत. तर शांता रंगास्वामी आयसीएच्या संचालक आहेत.
मुलाखत घेण्यापूर्वी बीसीसीआय़चे लोकपाल डीके जैन याबाबत अंतिम निर्णय घेतील. इतर पदावरील हितसंबंधाच्या अडचणीबद्दल याआधी डायना इडुल्जी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांनीसुद्धा पत्र लिहून याबद्दल विचारणा केली होती.