India vs Pakistan Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतील क्रिकेटचा पहिला सामना २९ जुलैला होणार आणि सुवर्ण व कांस्य पदकाच्या लढती ७ जुलैला होतील. या निमित्ताने India vs Pakistan हा महामुकाबलाही पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्री कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार आहे, तर स्मृती मानधनाकडे उप कर्णधारपद असणार आहे. शेफाली वर्मा, फिरकीपटू स्नेह राणा व राजेश्वरी गायकवाड, अष्टपैलू दीप्ती शर्मा व पूजा वस्त्राकर आणि यष्टिरक्षक-फलंदाज तानिया भाटीया हा संघात कायम आहेत. जेमिमा रॉड्रीग्ज व सब्बीनेनी मेघना यांच्यासह मेघना सिंग यांचे पुनरागमन झाले आहे. सिमरन दिल बहादूर, रिचा घोष व पूनम यादव यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
आठ संघांचा समावेश असणाऱ्या या स्पर्धेत भारताल A गटात ऑस्ट्रेलिया, बार्बाडोस व पाकिस्तान यांच्यासह स्थान दिले गेले आहे. २९ जुलैला भारत - ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्याने स्पर्धेची सुरूवात होईल. त्यानंतर ३१ जुलैला भारत-पाकिस्तान सामना होईल.
स्पर्धेचे वेळापत्रक ( CWG Cricket Time Table)
- २९ जुलै - भारत वि. ऑस्ट्रेलिया - सायं. ४.३० वा. आणि पाकिस्तान वि. बार्बाडोस - रात्री ११.३० वा.
- ३० जुलै - न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका - सायं. ४.३० वा. आणि इंग्लंड वि. श्रीलंका- रात्री ११.३० वा.
- ३१ जुलै - भारत वि. पाकिस्तान - सायं. ४.३० वा. आणि ऑस्ट्रेलिया वि. बार्बाडोस- रात्री ११.३० वा.
- २ ऑगस्ट - इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका - सायं. ४.३० वा. आणि न्यूझीलंड वि. श्रीलंका - रात्री ११.३० वा.
- ३ ऑगस्ट - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान - सायं. ४.३० वा. आणि बार्बाडोस वि. भारत - रात्री ११.३० वा.
- ४ ऑगस्ट - दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका - सायं. ४.३० वा. आणि इंग्लंड वि. न्यूझीलंड - रात्री ११.३० वा.
- ६ ऑगस्ट - उपांत्य फेरीचे सामने ( सायं. ४.३० वा. व रात्री ११.३० वा.)
- ७ ऑगस्ट - कांस्यपदकाची लढत - दुपारी ३.३० वा. आणि अंतिम सामना - रात्री १०.३० वा.
- थेट प्रक्षेपण - सोन स्पोर्ट्सवर