Commonwealth Games 2022 India Women vs Australia Women : ऑस्ट्रेलियाने आजच्या सामन्यात ताहलिया मॅग्राथचा ( Tahlia McGrath) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही तिला प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करून त्यांनी भारतासमोर १६२ धावांचे लक्ष्य ठेवले आणि प्रत्युत्तरात भारताचे दोन्ही ओपनर २२ धावांवर माघारी परतले आहेत. शेफाली वर्माला जीवदान मिळूनही तिच चूक करून ती बाद झाली आणि कोरोना पॉझिटिव्ह मॅग्राथने तिचा झेल घेतला. त्यानंतर सेलिब्रेशन कसं झालं ते पाहा...
बेथ मूनी व कर्णधार मेग लॅनिंग यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला, परंतु राधा यादवने अप्रतिम रन आऊट व सुरेख झेल टिपून पुनरागमन करून दिले. बेथ मूनी ऐकायला तयार नव्हती, तिने अर्धशतकी खेळी करून भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. दीप्ती शर्माने अफलातून झेल घेत मूनीला बाद केले. बेथ मूनी व मेग लॅनिंग यांनी ७ चेंडूंत ७४ धावांची भागीदारी केली. राधा यादवने मेग लॅनिंगला (३६) चतुराईने रन आऊट केले. अॅश्लेघ गार्डनरने ( २५) चौथ्या विकेटसाठी मूनीसह झटपट २४ चेंडूंत ३८ धावा जोडल्या. बेथ मूनी एका बाजूने खिंड लढवत होती. दीप्ती शर्माने वन हँडर झेल घेताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. बेथ मूनी ४१ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६१ धावांवर माघारी परतली. रेणूकाने आज दोन विकेट्स घेत स्पर्धेत सर्वाधिक ११ विकेट्सचा विक्रम नावावर केला. ऑस्ट्रेलियाने ८ बाद १६१ धावा केल्या.
शेफाली वर्मा व स्मृती मानधना या जोडीने पहिल्या षटकापासूनच फटकेबाजीला सुरुवात केली. प्रचंड आत्मविश्वासाने या दोघींनी फटके मारले. पण, डार्सी ब्राऊनने दुसऱ्या षटकात या आत्मविश्वासाचा चुराडा केला. मानधना ६ धावांवर त्रिफळाचीत झाली. पुढच्याच षटकात अॅश्लेघ गार्डनरच्या गोलंदाजीवर शेफालीने उत्तुंग फटका मारला, परंतु मेगन शूटकडून सोपा झेल सुटल्याने शेफालीला १० धावांवर जीवदान मिळाले. पण, चौथ्या चेंडूवर शेफालीने तिच चूक केली आणि यावेळेत ताहलिया मॅग्राथने झेल घेतला. भारताला २२ धावांवर दुसरा धक्का बसला.