बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ चा (CWG 2022) थरार दिवसेंदिवस रंगत चालला आहे. भारतीय खेळाडूंनी आपली प्रतिभा दाखवून भारताला आतापर्यंत ४ सुवर्ण पदके जिंकून दिली आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने देखील शानदार खेळी करत आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा दारूण पराभव केला होता. हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय संघ आज उपांत्यफेरीतील जागा निश्चित करण्यासाठी बारबाडोसविरूद्ध (India vs Barbados) भिडणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी करा किंवा मरा' असा असेल, कारण या सामन्यात विजयी होणारा संघ थेट उपांत्यफेरीत प्रवेश करेल. या स्पर्धेत भारतीय संघाचा आपल्या सलामीच्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. आजचा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरू होईल.
दरम्यान, पहिल्या सामन्यात टी-२० वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने भारताला ३ गडी राखून चितपट केले होते. मात्र भारताने जोरदार पुनरागमन करून दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध मोठा विजय मिळवला होता. तर बारबाडोसचा संघ देखील एक पराभव आणि एक विजय मिळून इथपर्यंत पोहचला आहे. बारबोडसने आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला मात्र दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलग २ सामने जिंकून अंतिम ४ मध्ये स्थान मिळवले आहे, तर पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे.
पाकिस्तानविरूद्ध भारताचे वर्चस्व भारतीय संघाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा दारूण पराभव करून विजयाचे खाते उघडले. पावसाच्या विलंबामुळे १८-१८ षटकांचा सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद ९९ धावा केल्या होत्या. पाकिस्तानच्या संघाने भारताला दिलेल्या १०० धावांचे आव्हान भारताने सहज पार केले आणि मोठा विजय मिळवला. भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक नाबाद ६३ धावांची खेळी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडला. दरम्यान कोरोनामुळे बाहेर गेलेली संघाची स्टार गोलंदाज पूजा वस्त्राकरला आजच्या सामन्यात संधी मिळते की नाही हे पाहण्याजोगे असेल. भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात सांघिक खेळी करून एकतर्फी वर्चस्व दाखवले होते, त्यामुळे आजच्या सामन्यात भारत विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे बारबाडोसच्या संघात काही वेस्टइंडिजच्या खेळाडूंचाही समावेश आहे.
आजच्या सामन्यासाठी असा असू शकतो भारतीय संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, एस मेघना, यास्तिका भाटिया, दीप्ती शर्मा, मेघना सिंग, रेणुका सिंग, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, स्नेह राणा.