Virender Sehwag Deletes Tweet: सध्या राष्ट्रकुल स्पर्धांचा माहोल आहे. भारताचा मोठा चमू या राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये दाखल झाला असून विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेत आहे. काल भारताला कॉमनवेल्थ गेम्सच्या महिला क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. पण आज मात्र भारताच्या संकेत सरगरने रौप्य तर गुरूराजा पुजारी याने कांस्यपदकाची कमाई करत भारताला वेटलिफ्टिंग मध्ये दोन पदके मिळवून दिली. या दोघांचे पंतप्रधान मोदींपासून ते प्रत्येक क्रीडा प्रेमीने तोंडभरून कौतुक केले. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग हा देखील भारतीय क्रीडापटूंचे कौतुक करण्यात कायम आघाडीवर असतो. पण यावेळी त्याने अतिउत्साहात येत एक ट्वीट केले आणि ते थोड्याच वेळात डीलिट करण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली.
भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आजच्या दिवसातील कॉमनवेल्थ गेम्सचा पूर्वार्ध आनंददायी ठरला. आधी ५५ किलो वजनी गटात मराठमोळ्या संकेत सरगरने रौप्यपदकाची कमाई केली, तर पाठोपाठ ६१ किलो वजनी गटात पी गुरूराजा याने कांस्य पदक पटकावून भारताचं नाव आणखी उंचावलं. यात दरम्यान, भारताची धावपटू हिमा दास हिने धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल विरेंद्र सेहवागने तिचं अभिनंदन केलं. "व्वा! खूपच चांगला विजय आहे. भारतीय खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय होत आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या हिमा दास हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तिचं अभिनंदन. आम्हाला तिचा अभिमान वाटतो", असे ट्वीट सेहवागने केले.
पण हिमा दासची स्पर्धा अद्याप झालेलीच नसल्याचे त्याला काही वेळातच समजल्यानंतर त्याला ट्वीट डिलीट करावे लागले. अनेकांनी सोशल मीडियावर हिमा दास बद्दलचं ट्वीट केलं होतं. पण तिची अद्याप स्पर्धाच झालेली नसल्याचे समजल्यानंतर अनेक हौशी आणि अतिउत्साही मंडळींवर ट्वीट डिलीट करण्याची नामुष्की ओढवली.