कोलंबो : दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या यापूर्वीच्या संघांच्या तुलनेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील विद्यमान संघाने अनेक पराक्रम केले, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले, ‘‘हा भारतीय संघ दोन वर्षांपासून एकत्र आहे. हा संघ आता अनुभवी झाला आहे. यापूर्वीच्या भारतीय संघांना नोंदवता न आलेला पराक्रम सध्याच्या या संघाने केलेला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास २०१५मध्ये श्रीलंकेमध्ये साकारलेल्या मालिका विजयाचे देता येईल.’’कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१५मध्ये २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्रीलंकेत मालिका जिंकली होती.शास्त्री म्हणाले, ‘‘भारताचे अनेक खेळाडू २० वर्षांपर्यंत खेळले. यादरम्यान त्यांनी अनेकदा श्रीलंकेचा दौरा केला; पण त्यांना येथे मालिका जिंकता आली नाही. या संघाने ते साध्य केले आहे. यापूर्वीच्या भारतीय संघांना जे करता आले नाही, असे बरेच पराक्रम या संघाने करून दाखविले आहेत तेही विदेशात.’’शास्त्री यांचे हे वक्तव्य वादग्रस्त आहे. कारण राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडला २००७मध्ये इंग्लंडमध्ये १-० ने पराभूत केले होते. त्याआधी, सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील संघाने आॅस्ट्रेलियाला २००४मध्ये १-१ अशा बरोबरीत रोखले होते. याव्यतिरिक्त नासीर हुसेनच्या इंग्लंड संघाविरुद्ध २००२मध्ये मालिका अनिर्णीत राखली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने न्यूझीलंडला २००९मध्ये १-० ने पराभूत केले होते, तर दक्षिण आफ्रिकेत २०११मध्ये १-१ ने मालिका बरोबरीत सोडवली. शास्त्री यांनी कर्णधार कोहलीची प्रशंसा करताना सांगितले, ‘‘विराट सध्या युवा आहे; पण कर्णधार म्हणून त्याच्यात पहिल्या कसोटी सामन्याच्या तुलनेत आता मोठा फरक दिसून येत आहे. अॅडिलेडमध्ये प्रथमच कसोटी संघाचे नेतृत्व करणारा विराट आणि आता २७ कसोटी सामन्यांत नेतृत्व करण्याचा अनुभव असलेला विराट, यांमध्ये बराच फरक दिसतो. विराट परिपक्व होत असून, भविष्यातही त्याला शिकण्याची संधी आहे. या वयातच त्याने बरेच काही मिळविले असून भविष्यातही त्याला बरेच काही करायचे आहे.’’शास्त्री पुढे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी ही नवी सुरुवात आहे. माझ्यासाठी ड्रेसिंग रूममधील प्रवेश नवा नव्हता. काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे मला काही कुठले विशेष बटण दाबावे लागले नाही.’’कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुढील वर्षी द. आफ्रिका, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. शास्त्री म्हणाले, ‘‘आम्हाला आगामी कालावधीच बरेच क्रिकेट बाहेर खेळायचे आहे. ही चांगली संधी आहे. जे कुठल्याही भारतीय संघाला साध्य झाले नाही, असा पराक्रम हा संघ करेल, असा मला विश्वास आहे. मी फार पुढचा विचार करीत नसून वर्तमानाबाबत विचार करतो. आम्ही श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आघाडी घेतली असून प्रत्येक लढत जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहोत.’’ (वृत्तसंस्था)के. एल. राहुलवर नजर : शास्त्रीवायरल फीव्हरमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकलेला भारताचा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुल याने मंगळवारी नेटमध्ये सराव केला; पण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दुसºया कसोटी सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत काहीच भाष्य केले नाही.शास्त्री म्हणाले, ‘‘राहुलची प्रकृती चांगली वाटत आहे. आमची त्याच्यावर नजर आहे. खडतर कालखंडातून त्याने वाटचाल केली आहे. त्याला दोन-तीन दिवस रुग्णालयामध्ये घालवावे लागले. आम्ही त्याच्याबाबत सावधगिरी बाळगत आहोत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. बेंच स्ट्रेथ मजबूत असणे चांगली बाब आहे. प्रत्येक स्थानासाठी चुरस असणे आनंदाची बाब आहे. संघाची निवड करताना ही चांगली डोकेदुखी ठरते. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर त्याचे स्थान घेण्यासाठी दुसरा खेळाडू सज्ज असतो. क्रिकेटच्या सर्वंच स्वरूपांमध्ये ही चांगली बाब आहे.’’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ...त्या तुलनेत विद्यमान संघाने अनेक पराक्रम केले: रवी शास्त्री
...त्या तुलनेत विद्यमान संघाने अनेक पराक्रम केले: रवी शास्त्री
दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या यापूर्वीच्या संघांच्या तुलनेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील विद्यमान संघाने अनेक पराक्रम केले, असे मत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 1:28 AM