Indian pacer Mohammed Shami on Babar Azam - मागील दहा वर्षांत विराटा कोहली, केन विलियम्सन, जो रूट आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले. कसोटी, वन डे किंवा ट्वेंटी-२० क्रिकेट या 'Fab Four' नं सातत्यपूर्ण कामगिरी करताना स्वतःला जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये नेऊन बसवले. पण, मागील दोनेक वर्षापासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम याचे नाव फॅब फोअरमध्ये असायला हवे, असे त्याच्या चाहत्यांचे मत आहे. बाबर आजमनंही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
२०२१ या वर्षातील सर्वोत्तम वन डे खेळाडू म्हणून गौरविले गेले. तसेच २०२१ वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० व वन डे संघाचे कर्णधारपदही बाबर आजमकडे सोपवले गेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यानं सहा सामन्यांत चार अर्धशतकांसह ३०३ धावा केल्या. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बाबरची टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्याशी तुलना होत आहे. पण, भारताचा गोलंदाज मोहम्मद शमी ( Mohammed Shami) यानं अशी तुलना चुकीची ठरेल आणि बाबरला अजून दीर्घकाळ स्वतःला सिद्ध करावे लागेल, असे मत व्यक्त केले.
India.com शी बोलताना शमी म्हणाला,''पाकिस्तान क्रिकेट संघांची कामगिरी चांगली होत आहे आणि त्यांचे ३-४ खेळाडू सातत्यानं योगदान देत आहेत. बाबर आजम हा ग्रेट खेळाडू आहे, यात शंका नाही, परंतु त्याची तुलना स्टीव्ह स्मिथ, जो रूट किंवा विराट कोहली यांच्याशी करणे हे अयोग्य ठरेल. त्याला आणखी काही वर्ष खेळू द्या आणि त्यानंतर त्याच्या खेळाचे मुल्यमापन करा. त्याची कामगिरी अशीच सातत्यपूर्ण होत राहिली तर तो पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू बनेल. त्याला माझ्या शुभेच्छा.''
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम वन डे तील सर्वोत्तम खेळाडू
वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या बाबरनं २०२१मध्ये ६ वन डे सामन्यांत ४०५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिक दौऱ्यावर त्यानं सर्वाधिक २२८ धावा करून मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. पाकिस्ताननं ती मालिका २-१ अशी जिंकली होती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो एकट्यानं लढला होता. तीन सामन्यांत त्यानं सर्वाधिका १७७ धावा केल्या होत्या, पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला १००+ धावा करता आल्या नव्हत्या. कमी वयात आयसीसी पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये बाबर पाचव्या क्रमांकावर आहे. तो २७ वर्षांचा आहे. विराट कोहली व क्विंटन डी कॉक यांनी २४ व्या वर्षी, केव्हिन पीटरसननं २५व्या आणि महेंद्रसिंग धोनीनं २७व्या वर्षी आयसीसीचा पुरस्कार जिंकला होता.