इंग्लंड, आॅस्ट्रेलियासह आणखी एका देशाचा समावेश
लंडन : इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) मंगळवारी चार देशांच्या प्रस्तावित स्पर्धेबाबत बीसीसीआयसोबत चर्चा केली असल्याचे कबूल केले. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमाची पायमल्ली करीत प्रत्येक वर्षी एका मोठ्या स्पर्धेचे आयोजन करण्याच्या उद्देशाने बघण्यात येत आहे.
बीसीसीआयने प्रस्तावित केलेल्या या वार्षिक स्पर्धेत भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया या तीन मोठ्या देशांसह (बिग थ्री) आणखी एक संघ सहभागी होईल. दखल घेण्याची बाब म्हणजे तीनपेक्षा अधिक संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेचे आयोजन आयसीसीअंतर्गत होत नसेल, तर त्या स्पर्धेला आयसीसीची मान्यता मिळत नाही. त्यामुळेच आता जागतिक क्रिकेटमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
ईसीबीने स्पष्ट केले की,‘डिसेंबरमध्ये बीसीसीआयसोबत झालेल्या बैठकीमध्ये चार देशांच्या स्पर्धेचा मुद्दा उपस्थित झाला होता. आम्ही आयसीसीच्या अन्य सदस्यांसोबत चर्चेचा पर्याय खुला ठेवला आहे. त्यात ही कल्पना साकार होऊ शकते किंवा नाही, यावर विचार होईल.’
त्याचवेळी, या स्पर्धेचे आयोजन झाले तर जागतिक क्रिकेटचे वेळापत्रक अधिक व्यस्त होईल आणि आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी मंगळवारी हा मुद्दा उपस्थित केला होता.
प्रत्येक देशाला यजमानपद
या प्रस्तावित स्पर्धेचे यजमानपद २०२१ पासून बिग थ्री एकामागोमाग करतील. याबाबत मात्र विभिन्न मतप्रवाह आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देशांच्या क्रिकेट बोर्डांना महसुलामध्ये वाढ होण्याची आशा आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वीच स्पर्धेबाबत आपले मत मांडले आहे, तर ईसीबीनेही यावर चर्चा झाल्याची कबुली दिली आहे. पण क्रिकेट आॅस्ट्रेलियाने अद्याप या विषयावर मत व्यक्त केलेले नाही.
Web Title: Competition of 5 countries by following ICC rules
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.