माऊंट माऊंगानुई : यंदा इंग्लंडमध्ये आयोजित होणाऱ्या वन डे विश्वचषकाआधी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूच्या स्थानासाठी भक्कम स्पर्धा निर्माण होणे ही सुखावह बाब असल्याचे मत केदार जाधव याने व्यक्त केले. सीओएने निलंबन मागे घेतल्याने हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाले.त्याला आता संघात स्थान मिळविण्यासाठी तामिळनाडूचा विजय शंकर याच्यासोबत स्पर्धा करावी लागेल. स्पिनर अष्टपैलू असलेला केदार हा देखील या जागेसाठी दावेदार आहे. जाधव म्हणाला,‘ एका स्थानासाठी इतकी स्पर्धा असणे हे कुठल्याही संघासाठी हितावह ठरते. ज्याला संधी मिळते त्याला इतके नक्की माहिती असते की चांगली कामगिरी करावीच लागेल.’ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबोर्नमध्ये मिळालेल्या निर्णायक विजयात मोलाची भूमिका वठविणाऱ्या केदारने कुणीही सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावरच संघात स्थान पटकविण्यास इच्छूक असतो, असे आवर्जून सांगितले. मी निवडीबाबत काय विचार करतो, याला अर्थ नाही. (वृत्तसंस्था)