नवी दिल्ली : बीसीसीआयचे नैतिक अधिकारी डी. के. जैन यांनी माजी क्रिकेटपटू व क्रिकेट सल्लागार समितीचे (सीएसी) सदस्य शांता रंगास्वामी व अंशुमान गायकवाड यांच्याविरुद्ध हित जोपासण्याच्या मुद्यावर दाखल करण्यात आलेली तक्रार अप्रासंगिक असल्याचे म्हटले. त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांच्याबाबतीत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.
जैन यांनी रंगास्वामी, गायकवाड व कपिल यांना २७ व २८ डिसेंबरला उपस्थित होण्याचा नोटीस बजावली होती. या तिघांनी यापूर्वीच सीएसीमधून राजीनामा दिलेला आहे. जैन यांनी ही नोटीस मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (एमपीसीए) आजीवन सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर पाठविली होती. गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, ‘सीएसी सदस्य एकाचवेळी अनेक भूमिका बजावत असून बीसीसीआयच्या घटनेनुसार एक व्यक्ती एका वेळी एकापेक्षा अधिक पदावर राहू शकत नाही.’
जैन म्हणाले,‘गायकवाड व रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्यामुळे तक्रार फेटाळण्यात आली आहे. कपिल प्रकरणात तक्रारकर्त्याला आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी अधिक वेळ हवा आहे आणि मी तो दिलेला आहे.’ रंगास्वामी व गायकवाड आता भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे प्रतिनिधी म्हणून कार्यकारिणीचा भाग आहे. रंगास्वामी यांनी भारतीय क्रिकेट संघटनेचे (आयसीए) संचालक पद सोडले आहे. कपिल व रंगास्वामी जैन यांच्यापुढे हजर झाले नाही, तर गायकवाड मात्र येथे पोहचले. हित जोपासण्याच्या प्रकरणाला सामोरे जात असलेले बीसीसीआयचे अधिकारी मयंक पारिख यांच्याबाबतही अद्याप कुठला निर्णय झालेला नाही. हित जोपासणे बीसीसीआयमध्ये गंभीर मुद्दा ठरत असतून त्यासाठी बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश मागितले आहेत. (वृत्तसंस्था)
Web Title: Complaint against Shanta Rangaswamy, Anshuman Gaikwad is irrelevant
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.