मुंबई: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये होतो. जसप्रीतच्या गोलंदाजीची शैली अतिशय वेगळी आहे. त्याची ऍक्शन कॉपी करणं खूप अवघड आहे. अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक बुमराहच्या गोलंदाजीचा फॅन आहे. नवीन टी-२० विश्वचषकात खेळताना दिसला. त्याची गोलंदाजीची ऍक्शन बुमराहसारखी आहे.
नवीन उल हक बुमराहच्या गोलंदाजीचा चाहता आहे. माझ्या कारकिर्दीत मला बुमराहनं केलेल्या कामगिरीच्या ५० टक्के कामगिरी जरी करता आली, तरी मी समाधानी असेन, अशी भावना नवीननं बोलून दाखवली. अतिशय अवघड परिस्थितीतही बुमराह मैदानावर शांत असतो. आव्हानात्मक परिस्थितीत तो स्वत:वर उत्तम नियंत्रण ठेवतो. ही बाब शिकण्यासारखी आहे. त्याची गोलंदाजी मला खूप आवडते, असं नवीन म्हणाला.
२२ वर्षांच्या नवीनच्या गोलंदाजीची ऍक्शन बऱ्याच प्रमाणात बुमराहसारखी आहे. बुमराहसारखी आर्म ऍक्शन असल्यानं नवीनची टी-२० विश्वचषकात खूप चर्चा झाली. नवीननं बुमराहची कॉपी केल्याचं अनेकांनी म्हटलं. मात्र हा केवळ योगायोग असल्याचं नवीननं सांगितलं. आम्हा दोघांच्या ऍक्शनमध्ये समानता आहे. मात्र हा निव्वळ योगायोग आहे. बुमराहकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असं नवीननं म्हटलं.