ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू गुरुवारी मायदेशी परतले. कर्णधार अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे मुंबईत व्हाया दुबई दाखल झाले असून त्यांना मुंबई महानगर पालिकेनं होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. BMC आयुक्त इक्बाल चहल यांनी ही माहिती दिली. खेळाडूंची RT-PCR चाचणी होणार असून त्यांना सक्तिचं होम क्वारंटाईन व्हावे लागेल. त्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
भारताने ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. दुखापतग्रस्त खेळाडूंची वाढणारी संख्या असूनही अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं गॅबात इतिहास रचला. कोरोना नियमानुसार संघातील खेळाडूंना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. दरम्यान दिल्लीत दाखल झालेल्या रिषभ पंतलाही होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून छोटेखानी सत्कार करण्यात आला.