Indian Premier League ( IPL 2020) मध्ये रविवारी किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) यांच्यातल्या सामन्यात कमालीची चुरस पाहायला मिळाली. लोकेश राहुल पंजाबला सहज विजय मिळवून देईल असे वाटत असताना जसप्रीत बुमराहनं १८व्या षटकात त्याला बाद करून सामना फिरवला. त्यानंतरही पंजाबनं ५ बाद १७६ धावांवर समाधान मानावे लागले आणि सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्यानं लढत डबल सुपर ओव्हरमध्ये खेळवला गेला. त्यात पंजाबनं बाजी मारली
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सनं ६ बाद १७६ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात किंग्स इलेव्हन पंजाबनंही ५ बाद १७६ धावा करताना सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये ५-५अशी बरोबरी झाल्यानं पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सकडून किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानावर उतरले. मुंबईला 1 बाद 11 धावांवर समाधान मानावे लागले. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचून ख्रिस गेलनं पंजाबवरील दडपण हलकं केलं. त्यानंतर मयांक अग्रवालनं दोन चौकार खेचून पंजाबचा विजय पक्का केला.
या पराभवाने मुंबई इंडियन्सची सलग पाच सामन्यांची विजयी मालिका खंडीत झाली आणि त्यांना ९ सामन्यांत ६ विजयासह गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावरच रहावे लागले. त्यात भर अशी की चार वेळा आयपीएल जेतेपद उंचावणारा कर्णधार रोहित शर्मा आजारी पडल्याची बातमी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डनं दिली. सामन्यानंतर पोलार्ड म्हणाला,''रोहित शर्माला बरं वाटत नाही, असं मला सांगण्यात आले आहे. त्यामुळेच सामन्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी आलो आहे. तो फायटर आहे.''
पाहा व्हिडीओ...
यावेळी पोलार्डनं जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले. तो म्हणाला,''बुमराह वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे. मागील अनेक वर्षांपासून तो जागतील नंबर वन गोलंदाज आहे.'' मुंबई इंडियन्सचा पुढील मुकाबला २३ ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शाहजाह क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.