वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा भारतात सुरू असताना इंडियन प्रीमिअर लीग २०२४ ( IPL 2024) ची मोठी बातमी समोर येत आहे. आयपीएलमध्ये सौदी अरेबिया ४१ हजार कोटींची गुंतवणुक करण्यासाठी तयार असल्याची बातमी समोर आलीच होती. त्यात IPL Auction ची तारीख आणि ठिकाण आज ठरले. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल २०२४साठीचा लिलाव दुबाईत होणार आहे आणि १९ डिसेंबरला येथील कोका-कोला एरेनामध्ये ता पोर पडेल.
आयपीएलच्या इतिहासात प्रथमच लिलाव परदेशात पार पडणार आहे. लिलावासाठी इस्तानबुल, टर्की यांची नावं चर्चेत होती, परंतु हा प्लान बासनात गुंडाळला गेला. याबाबत फ्रँचायझींसोबत शुक्रवारी चर्चा केली गेली आणि त्यांच्या मागणीनुसार संघात कायम राखलेल्या ( Retained Players List) खेळाडूंची यादी देण्यासाठी मुदतवाढ दिली गेली. १५ नोव्हेंबर एवजी आता २६ नोव्हेंबरला रिटेन लिस्ट बीसीसीआयकडे सोपवायची आहे.
१० आयपीएल टीमची सॅलरी कॅप १०० कोटी केली गेली आहे आणि खेळाडूंच्या कराराचे हे तिसरे व शेवटचे वर्ष आहे आणि त्यानंतर पुढच्या वर्षी मेगा ऑक्शन होणार आहे. लिलावाचे ठिकाण म्हणून कोका-कोला एरेनाची निवड काळजीपूर्वक केली गेली आहे. हे दुबई मधील एक गजबजलेले स्थान आहे, जे मैफिली आणि विविध क्रीडा कार्यक्रमांसह उच्च-प्रोफाइल कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ओळखले जाते. आजच मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या ट्रेडिंग झाले. रोमारियो शेफर्ड आगामी हंगामासाठी LSGमधून मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार आहे. त्याच्या मूळ किमती ५० लाखांवर ही ट्रे़डिंग झाली आहे.