shashi tharoor । नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवने ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये भारतासाठी अनेकदा अविस्मरणीय खेळी केली आहे. मात्र वन डे सामन्यांमध्ये मिळालेल्या संधींचा फायदा उठवण्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे सूर्यकुमार यादवला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतीय वन डे संघात खेळण्याची संधी मिळाली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव गोल्डन डकचा बळी ठरला. यासोबतच त्याने एक लाजिरवाणा विक्रमही आपल्या नावावर केला आहे.
दरम्यान, सततच्या फ्लॉप शोमुळे सूर्यकुमार यादववर खूप टीका होत आहे. अशातच आता कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी सूर्याच्या फ्लॉप शोचा समाचार घेतला आहे. सूर्याच्या खराब खेळीनंतर सोशल मीडियावर संजू सॅमसनची चर्चा रंगली आहे. चाहत्यांशिवाय अनेक माजी खेळाडूंनी संजू सॅमसनला वन डे संघात स्थान मिळावे यासाठी आवाज उठवला होता. आता थरूर यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून सॅमसनसाठी बॅटिंग केली आहे.
थरूर यांची सॅमसनसाठी 'बॅटिंग'काँग्रेसचे नेते शशी थरूर नेहमी क्रिकेटबाबत आपले मत मांडत असतात. ते अनेकदा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या बाजूने ट्विट करतात. सूर्यकुमार यादवच्या फ्लॉप शोनंतर शशी थरूर यांनी पुन्हा एकदा भारतीय संघ व्यवस्थापनाला संजू सॅमसनची आठवण करून दिली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "सूर्यकुमार यादवने सलग तीन गोल्डन डकसह एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. अशा स्थितीत वन डे क्रिकेटमध्ये 66 च्या सरासरीने फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनला संघात स्थान मिळवण्यासाठी काय करावे लागेल हे विचारणे योग्य ठरणार नाही?."
ऑस्ट्रेलियाने जिंकली मालिकाखरं तर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर बाद झाला. पहिल्या दोन सामन्यांत मिचेल स्टार्कने सूर्याला एलबीडब्ल्यू करून बाहेरचा रस्ता दाखवला. तर तिसऱ्या सामन्यात सूर्या ॲश्टन अगरचा शिकार झाला. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली होती. पण दुसऱ्या सामन्यात भारताचा दारूण पराभव करून कांगारूच्या संघाने 1-1 ने मालिकेत बरोबरी साधली. मग अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी विजय मिळवून मालिका खिशात घातली. भारतीय फलंदाजांना आलेले अपयश भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"