ललित झांबरे
आयपीएलमध्ये (IPL) धावांची बरसात व षटकार-चौकारांची आतषबाजी होत असताना जे काही मोजके गोलंदाज चमकत आहेत आणि जे फलंदाजांची परीक्षा घेत आहेत त्यापैकी एक म्हणजे कासिगो रबाडा (Kasigo Rabada). दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) हा जलद गोलंदाज एखाद दुसऱ्या सामन्यातच नाही तर जवळपास प्रत्येकच सामन्यात सातत्याने चांगली कामगिरी करतोय. त्याने थोडथोडक्या नाही तर गेल्या सलग 20 सामन्यांमध्ये किमान एक तरी विकेट काढली आहे.
याबाबतीत आता केवळ ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) हाच त्याच्या पुढे आहे तर विनयकूमारला रबाडाने मागे टाकले आहे. ड्वेन ब्राव्होने 2012 ते 2015 दरम्यान लागोपाठ 27 सामन्यात किमान एकतरी विकेट काढली आहे तर विनयकुमारने 2012 व 13 मध्ये 19 सामन्यांत अशी कामगिरी केली आहे. ब्राव्हो, रबाडा व विनयकुमारनंतर लसिथ मलिंगा आहे ज्याने 2015 ते 2017 दरम्यान सलग 17 सामन्यात एक तरी विकेट काढली होती.
रबाडाने राजस्थान राॕयल्सविरुध्द 35 धावात 3 बळी मिळवताना यंदा 6 सामन्यात आपल्या बळींची संख्या 15 वर नेली आहे. यासह तो सध्यातरी पर्पल कॕपचा मानकरी आहे. यंदा गोलंदाजीत त्याची सरासरी 12.33 ची असून इकाॕनाॕमी 7.50 अशी प्रभावी आहे.