लाहोर: भारतीय संघाने (Team India) २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानला (Pakistan) पराभूत केलं. त्याचा बदला पाकिस्तानने २०२१ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेत घेतला. पण २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत भारत पाक सामन्यात एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांची भारतीय फलंदाज धुलाई करत असताना पाकिस्तानचा त्यावेळचा कर्णधार सर्फराज अहमद (Sarfaraz Ahmed) या मैदानातच जांभई देत होता. या फोटोमुळे सर्फराज खूपच चर्चेत आला होता. त्याच्या फोटोचे मोठ्या प्रमाणावर मीम्सही व्हायरल झाले होते. पण आता सर्फराज अहमद एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
पाकिस्तानच्या संघाचे सध्या नेतृत्व फलंदाज बाबर आझमकडे आहे. सर्फराज अहमदकडून २०१९ मध्येच संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आल्यानंतर बाबर आझम संघाचा कर्णधार झाला. त्यानंतर सर्फराजला पाकिस्तानच्या १८ जणांच्या स्कॉडमध्ये जरी संधी मिळत असली तरी त्याला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण झाले आहे. मोहम्मद रिझवानच्या रूपाने पाकिस्तानला प्रतिभावान यष्टीरक्षक-फलंदाज असा खेळाडू मिळाला असल्याने सर्फराजला संघात स्थान मिळत नाहीये.
सर्फराजला संघात स्थान न मिळण्याच्या मुद्द्यावरूनच पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बट याने सर्फराजला खोचक सल्ला दिला. "सर्फराजने खेळ सुधारला नाही तर त्याच्यासाठी अडचणी वाढतील. आज त्याच्याकडे काहीच उत्तर नाहीये. गेल्या दीड वर्षांपासून तो पाकिस्तानच्या संघासोबत नुसता फिरतोय पण त्याला संधी मिळत नाहीये. कारण तो दुसऱ्या क्रमांकाचा यष्टिरक्षक म्हणून प्रवास करत आहे. (पहिली पसंती रिझवानला दिली जाते.) त्याने स्वतःच्या कामगिरीकडे लक्ष दिले पाहिजं. इतरांच्या कामांमध्ये हस्तक्षेप करू नये", असं सलमान बट म्हणाला.
"पाकिस्तानला 'ऑन-ड्युटी' विकून खाणारे लोक जर आता चारित्र्याच्या गप्पा मारणार असतील तर"
सलमान बटला सर्फराजने नाव न घेता तोडीस तोड उत्तर दिलं. सलमान बट आणि तत्कालीन काही क्रिकेटपटू यांना मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी क्रिकेटबंदी घालण्यात आली होती. त्याच जखमेवर मीठ चोळत सर्फराजने एक ट्वीट केलं. "पाकिस्तानला 'ऑन-ड्युटी' विकून खाणारे लोक जर आता चारित्र्याच्या गप्पा मारणार असतील तर देवानीच त्यांच्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे", असं ट्वीट सर्फराजने केलं. या ट्वीटमध्ये त्याने कोणाचंही नाव घेतलं नाही, पण हे ट्वीट कोणासाठी करण्यात आलंय ते चाहत्यांना मात्र बरोबर समजलं.