नवी दिल्ली : प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि ते खेळाडूंनी पाळायचे असतात. खेळाडू हे नियम पाळत आहे किंवा नाही, हे पाहणंही पंचांचे काम असते. पण पंचांनीच नियम मोडला तर दाद मागायची कोणाकडे... अशीच एक घटना क्रिकेटच्या मैदानात घडल्याचे पाहायला मिळाले.
दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारपासून सुरु झाला. पण आज या सामन्यांत पंचांनी अशी काही गोष्ट केली की मोठा विवाद व्हायला वेळ लागला नाही.पंचांचा निर्णय अंतिम राहील, असे आपण बऱ्याचदा ऐकतो. पण आता पंचांच्या विरोधात दाद मागण्याची मुभा क्रिकेटमध्ये आहे.
या सामन्यातील दुसरे षटक विश्वा फर्नांडो टाकत होता. या षटकात हशिम अमलाविरोधात श्रीलंकेच्या संघाने पायचीतचे अपील केले. ते पंच अलीम दार यांनी फेटाळले. त्यानंतर दोन चेंडूंनंतर डीन एल्गर हा झेलबाद झाल्याची अपील श्रीलंकेच्या खेळाडूंनी केली. पंचांनी ती पुन्हा नाकारली. त्यावेळी श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने यष्टीरक्षक निरोशन डिकवेला याला याबाबत विचारणा केली. यावेळी डिकवेलाने झेल घेतल्याचे सांगितले आणि करुणारत्नेने अलीम दार यांच्याकडे रीव्ह्यू मागितला. त्यावेळी अलीम दार यांनी रीव्ह्यू करण्याचा वेळ निघून गेला, असे सांगितले. त्यानंतर जेव्हा अॅक्शन रीप्ले दाखवला गेला तेव्हा एल्गर बाद असल्याचे पाहायला मिळाले. तेव्हा श्रीलंकेला धक्का बसला.
श्रीलंकेचा संघ जेव्हा उपहाराला गेला तेव्हा त्यांना सर्वात मोठा धक्का बसला. कारण करुणारत्नेने मागितलेला रीव्ह्यू हा वेळेत मागितला होता. त्यानुसार अलीम दार यांनी तिसऱ्या पंचांकडे हे प्रकरण सोपवायला हवे होते. पण अलीम दार यांच्यामुळे श्रीलंकेला हा रीव्ह्यू घेता आला नाही.
काय आहे नियमजेव्हा चेंडू 'डेड' होतो त्यानंतर 15 सेकंदांमध्ये संघांना पंचांकडे रीव्ह्यू मागता येऊ शकतो. पण या प्रकरणात करुणारत्नेने 12 सेकंदांमध्येच रीव्ह्यू मागितला होता. पण तरीही अलीम दार यांनी करुणारत्नेची विनंती नाकारली आणि फलंदाजाला जीवदान मिळाले.