Join us  

क्रिकेटर राजवर्धन हंगरगेकरच्या वयावरून वाद; चौकशी रिपोर्ट क्रीडा आयुक्तांना पाठवला

जन्मतारखेत केला बदल : जि. परिषदेचा चौकशी अहवालात ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 6:31 AM

Open in App

उस्मानाबाद : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून उदयाला आलेल्या उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरच्या वयाचा वाद आता जन्माला आला आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये खाडाखोड करून जन्म दिनांक बदलल्याचा चौकशी अहवाल जिल्हा परिषदेने क्रीडा आयुक्तांना नुकताच पाठविला आहे.

उस्मानाबादचा युवा अष्टपैलू क्रिकेटर राजवर्धन हंगरगेकर याच्या वयावरून वाद निर्माण झाला आहे. जन्मतारीख बदलल्याच्या तक्रारीनंतर क्रीडा आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून याबाबत चौकशी करावी व अहवाल सादर करावा, अशी सूचना केली होती. याअनुषंगाने शिक्षण विभागाची पाच सदस्यीय चौकशी समिती जिल्हा परिषदेने नेमली. या समितीने चौकशी पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे अहवाल दिला आहे. या अहवालात राजवर्धनची जन्मतारीख बदलली गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उस्मानाबादच्या तेरणा पब्लिक स्कूलमध्ये पहिलीला प्रवेश घेताना त्याची जन्मतारीख १० जानेवारी २००१ अशी नोंद करण्यात आलेली आहे. सातवीपर्यंत हीच जन्मतारीख शाळेत नोंद आहे. माध्यमिकच्या रजिस्टरवर प्रथमत: हीच तारीख नोंद होती. मात्र, ७ जुलै २०१६ रोजी उस्मानाबाद नगरपरिषदेने दिलेल्या जन्मदाखल्याच्या आधारे या शाळेच्या मुख्याध्यापकांनी जनरल रजिस्टरमध्ये खाडाखोड करून १० नोव्हेंबर २००२ अशी नवीन नोंद घेतली आहे. दहावीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरही २००२ चीच तारीख घेण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी क्रीडा आयुक्तांना नुकताच पाठवून दिला आहे.

दरम्यान, उस्मानाबादचा युवा क्रिकेटर राजवर्धन हंगरगेकर याने काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या आशिया चषक तसेच अंडर १९ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करीत आपली चमक दाखविली होती. आयपीएलमध्येही त्याची दमदार एंट्री झाली असून, चेन्नई संघाने त्यास दीड कोटी रुपयांत आपल्या संघात घेतले आहे. या यशापाठोपाठ त्याच्या मागे आता वयाचा वाद सुरू झाला आहे.

शाळेत प्रवेश घेताना जन्मतारीख चुकण्याचा संभव असतो. त्यामुळे नियमानुसार दहावीपर्यंत विद्यार्थ्यास त्याची खरी जन्मतारीख पुरावे सादर करून बदलता येते. मात्र, यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मुख्याध्यापकांनी तसा संबंधित विद्यार्थ्याचा प्रस्ताव पाठवावा लागतो. राजवर्धनच्या प्रकरणात असा कोणताही प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आला नसल्याचे दिसून आले आहे. मुख्याध्यापकांनी त्यांच्याच स्तरावर तारीख बदलल्याचेही दिसून आले आहे.  - गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, उस्मानाबाद

टॅग्स :आयपीएल २०२२
Open in App