पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल २०२५ साठी बीसीसीआयच्या मुख्यालयामध्ये आयपीएलच्या सर्व टीम मालकांची बैठक बोलविण्यात आली होती. यामध्ये मेगा ऑक्शनपूर्वी खेळाडूंना टीममध्ये ठेवण्याबाबतच्या नियम आणि संख्येवर चर्चा होणार होती. यावरून टीमच्या मालकांमध्ये एवढी वादावादी झाली की आता मालकांचे दोन गट पडले आहेत. यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे.
या बैठकीत मेगा ऑक्शनची गरज आणि भविष्य याच विषयावर वाद सुरु झाले आणि पुढे चर्चा गेलीच नाही. काही टीम मालकांमध्ये जोरदार वादावादी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये शाहरूख खान, काव्या मारन यांचाही समावेश असल्याचे समजते आहे. यानंतर बीसीसीआयने येत्या काळात आम्ही आमचा निर्णय कळवू असे टीम मालकांना सांगून बैठक संपविली आहे.
अनेक टीमच्या मालकांनी मेगा ऑक्शन नकोच अशी भूमिका घेतली होती. यामध्ये सर्वात पुढे कोलकाताचा मालक शाहरुख खान आणि सनरायझर्सची मालक काव्या मारन होती. दोन्ही संघ यावेळी आयपीएलमध्ये फायनलमध्ये पोहोचले होते. या दोघांनाही आपली टीम आहे तशीच ठेवायची आहे. टीमला ब्रँड बनविणे आणि फँससोबत जोडण्यासाठी स्थिरतेची गरज असल्याचे कारण या दोघांनी दिले होते.
यावरून नेस वाडिया आणि शाहरूख खान यांच्यात वाद झाला. शाहरूखने बैठकीत मोठ्या आवाजात वाद घातल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. पंजाब किंग्सचा मालक वाडिया याच्यासोबत खेळाडू रिटेन करण्याच्या संख्येवरून शाहरुखने वाद घातला. यावर वाडिया यांनी असा कोणता वाद झाला नसल्याचे म्हटले आहे.
या वादात शाहरुखला काव्या मारनची साथ मिळाली. आम्हाला मेगा नको तर छोटा लिलाव हवा आहे. एखादी टीम बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. युवा खेळाडूंना चांगला प्लेअर बनण्यासाठी वेळ लागतो. अभिषेक शर्माला चांगले प्रदर्शन करण्यासाठी तीन वर्षे लागल्याचे सांगत काव्यानेही शाहरुखच्या म्हणण्याला साथ दिली. यानंतर खरा वाद सुरु झाला.