Corona scares before the Asia Cup : आशिया चषक २०२३ च्या आधी एक मोठं संकट समोर आलं आहे. श्रीलंकेच्या २ खेळाडूंची COVID-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनासाठीचे नियम शिथील केल्यानंतर सर्वकाही सुरळीत झाल्याचे वाटते होते. पण, २ खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
श्रीलंकेचा रिपोर्टर दनुष्का अरविंदाच्या म्हणण्यानुसार, लंकन संघाचा सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि यष्टीरक्षक- फलंदाज कुसल परेरा या दोघांचीही कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आशिया चषक स्पर्धेला एक आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. यंदा ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका येथे सामने होणार आहेत. पाकिस्तान ४ सामन्यांचे यजमानपद भूषवणार आहे, तर भारतासह उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जातील. श्रीलंका ३१ ऑगस्ट रोजी पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी दुसर्या सामन्यात अफगाणिस्तानशी भिडतील.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी फर्नांडोचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. COVID-19 लसीचा बूस्टर डोस दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर त्याला संसर्ग झाला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर श्रीलंकेच्या मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये परेराला विषाणूची लागण झाली होती. श्रीलंका क्रिकेट (SLC) कडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. श्रीलंका आशिया चषक स्पर्धेतील गतविजेता आहे आणि घरच्या परिस्थितीत पुन्हा एकदा फेव्हरिट म्हणून सुरुवात करेल.