चेन्नई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा सर्वसामान्यांपासून व्हीआयपी मंडळींपर्यंत सर्वांना बसला आहे. (Coronavirus in India) भारतीय क्रिकेटमधील खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीयही त्याला अपवाद राहिलेले नाहीत. काही क्रिकेटपटूंच्या नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर भारताचा फिरकीपटू रविचंद्र अश्विन ( R Ashwin) याचे संपूर्ण कुटुंबच कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर त्याने आयपीएल अर्ध्यावर सोडून कुटुंबाची साथ देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, आता अश्विनने त्या दिवसांमधील अनुभव सांगितला आहे.
कुटुंबातील अनेक सदस्य कोरोनाबाधित झाल्यानंतर रविचंद्रन अश्विनच्या वडिलांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले. दरम्यान, वडिलांना कोरोनाविरोधात लढण्यात बळ देण्याचे काम कोरोनाविरोधातील लसीने केल्याचे अश्विनने म्हटले आहे.याबाबत अश्विनने सांगितले की, मागाच काही काळ आमच्या कुटुंबासाठी खडतर होता. मी आयपीएल खेळत होतो. त्याचवेळी आमच्या कुटुंबामध्ये कोरोनाने संकट बनून प्रवेश केला. सुरुवातीला माझ्या पत्नीने मला याबाबत फार सांगितले नाही. मात्र मुलांना ताप आल्यानंतर तिने मला ही गोष्ट सांगितली. मी तातडीने आयपीएल सोडून कुटुंबीयांना आधार देण्यासाठी रवाना झालो. यादरम्यान, माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली. त्यांची ऑक्सिजन पातळी खूप कमी झाली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. सुरुवातीला रुग्णालयात उपचार करूनही या उपचारांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र माझ्या वडिलांनी कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे कोरोनाला हरवणे त्यांना शक्य झाले, असे अश्विनने सांगितले. सध्याच्या काळात कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोनाविरोधाती ही लस घ्यावी, असे आवाहनही अश्विनने केले आहे.