झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहे. देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून अनेक उपाय अवलंबण्यात येत आहेत. कोरोनामुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली होती. मात्र तपासणी अहवालात केन रिचर्डसचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाची टीम दक्षिण आफ्रिकेवरून परतली आहे. आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये ऑस्ट्रेलियाची टीम दाखल झाली असून, त्यात केन रिचर्डसचा समावेश नाही. त्यानं काल रात्रीच संघाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घशाला त्रास होत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याचा COVID-19च्या तपासणीसाठी नमुना घेण्यात आला होता. मात्र या तपासणीच्या अहवालात रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर केन रिचर्डसचा पुन्हा संघात रुजू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. जुलै महिन्यात होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवरही रद्द करण्याचं संकट ओढावलं आहे. तसेच भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आयपीएललाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
आयपीएल 2020ची स्पर्धा 29 मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र कोरोनामुळे दिल्ली सरकारने दिल्लीत एकही आयपीएलचे सामने न खेळवण्याचे जाहीर केले. यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सामने 29 मार्च ऐवजी 15 एप्रिलपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आम्ही आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.