कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे स्थानकावर मंगळवारी उसळलेली गर्दी पाहून टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि फिरकीपटू हरभजन सिंग यांनी चिंता व्यक्त केली.
वांद्रे येथे स्वयंसेवी संस्था मोफत अन्नधान्य वाटप करीत होती. हे घेण्यासाठी लोक जमले असतानाच तेथे मोठ्या प्रमाणात मजूरही जमू लागले. हीच गर्दी नंतर आम्हाला धान्य नको, गावी जाऊ द्या, असे म्हणू लागली. दुपारी ३ नंतर हा गोंधळ वाढतच गेला. हे समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्थानिक नेत्याच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यात गर्दीतले काही जण हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीमार करत त्यांना घरी पाठवले. यात प्रचंड गोंधळ उडाला.
हार्दिक म्हणाला,''शांत राहा आणि घरीच राहा. या संकटावर मात करण्याचा हाच एक उपाय आहे. आपल्याला संघटित राहायला हवे आणि विश्वास ठेवायला हवा.''
हरभजन म्हणाला,''प्रत्येकाला घरीच ठेवण्यासाठी कर्फ्यू हा एकमेव पर्याय आहे. वांद्रे स्थानकात जे घडलं ते स्वीकारार्ह नाही. लोकांना परिस्थितीचं गांभीर्य अजून समजलेलं नाही. ते स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत.''