कोरोना व्हायरसमुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे रोजंदारी कामगारांना घरीच बसावे लागले आणि त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीला अनेक संस्था, सरकार काम करत आहेत. भारतीय संघाचा फिरकीपटू शाहबाज नदीमनेही समाजकार्य करण्याचं ठरवलं आहे. त्यानं लोव्हर-मिडल क्लास कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. धनबाद येथील झाहीरा भागातील 350 गरीब कुटुंबांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्यानं आतापर्यंत 250 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या आहेत.
नदीमने सांगितले की,''आतापर्यंत आम्ही 250 कुटुबांपर्यंत पोहोचलो आहोत. येत्या काही दिवसांत आम्ही आणखी कुटुंबांना मदत करणार आहोत.'' डावखुऱ्या फिरकीपटूनं गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केले होते. त्यात त्यानं दोन्ही डावांत मिळून 4 विकेट्स घेतल्या होत्या.
नदीम म्हणाला,''या संकटप्रसंगी आपण इतके नक्कीच करू शकतो. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं का मी करत आहे. तुम्हीही पुढाकार घ्या. लोकांना थेट मदत करण्याचा पर्याय मी निवडला. माझं संपूर्ण कुटुंब या कामात मला मदत करत आहे. त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून आम्ही परवानगी मागितली आहे. स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी हे अन्नधान्य गरजूंच्या घराघरात पोहोचवत आहेत.''
यापूर्वी, भारताच्या युवा संघातील गोलंदाज इशान पोरेल यानंही 100 गरजूंना अन्न पुरवण्याची जबाबदारी उचलली. महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं 50 लाख, सुरेश रैनानं 52 लाख, अजिंक्य रहाणे 10 लाख, गौतम गंभीर 1 कोटी आणि दोन वर्षांचे वेतन कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला दिले आहेत. त्याशिवाय सौरव गांगुलीनेही 50 लाखांचे तांदुळ गरिबांसाठी दान केले आहेत.