नवी दिल्ली : ‘कोरोनाच्या अशा परिस्थितीत, प्रत्येक बोर्डाने मग ते बीसीसीआय असो किंवा इतर कोणीही असो, त्यांनी भारत सरकारची परवानगी घ्यावी. त्यांच्याकडून अर्ज आल्यावर सरकार निर्णय घेईल,’ असे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी भारतीय क्रिकेट संघाच्या संभाव्य दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत सरकारची भूमिका मांडताना स्पष्ट केले.
दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या दौऱ्यावर टांगती तलवार आहे. जगभरातील सर्व देश दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करीत आहेत. भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडिया डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. मात्र, या दौऱ्याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली.
टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले होते. ‘आताच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या संपर्कात आहोत. अशा कठीण काळात, आपण फक्त आशा करू शकतो की गोष्टी नियंत्रणात असतील,’ असे बीसीसीआयने म्हटले होते. याविषयी ठाकूर पुढे म्हणाले,‘ जगात जेथे जेथे कोरोनाचा नवा धोका असेल तेथे संघ पाठविण्यात येऊ नये. बीसीसीआयने याबाबत सरकारकडे विनंती केल्यास आम्ही संघ पाठवायची परवानगी द्यायची की नाही याचा विचार करू,’
भारताचा द. आफ्रिका दौरा होईल : बेहार्डियनजोहान्सबर्ग : कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने खळबळ माजली असतानाच भारतीय संघ पुढच्या महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर नक्की येईल, अशी अपेक्षा माजी अष्टपैलू खेळाडू फरहान बेहार्डियन याने व्यक्त केली आहे. आमच्या देशातील युवा खेळाडूंच्या भविष्यासाठी हा दौरा होणे फारच महत्त्वपूर्ण असल्याचे मत बेहार्डियनने व्यक्त केले. भारताला जोहान्सबर्ग, पर्ल, सेंच्युरियन आणि केपटाऊन येथे तीन कसोटी, तीन वन डे आणि चार टी-२० सामने खेळायचे आहेत. नवा विषाणू आढळल्याने दौऱ्यावर संकट ओढवले आहे. दौऱ्याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच्या सल्ल्यानुसार घेऊ, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बेहार्डियनने ट्वीट केले,‘जगातील सर्वांत मोठा क्रिकेट खेळणारा देश आमच्या देशाचा दौरा करील, अशी अपेक्षा आहे. द. आफ्रिकेच्या पुढच्या पिढीला दौऱ्याची गरज असेल.’ बीसीसीआय पुढील काही दिवस क्रिकेट द. आफ्रिकेसोबत चर्चा सुरू करील, असे संकेत मिळत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने नव्या विषाणूला ओमिक्रमोन असे नाव दिले आहे.