कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी पुढाकार घेतला आहे. सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, गौतम गंभीर, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग, युवराज सिंग यांच्यानंतर भारताचे दिग्गज कसोटीपटू गावस्कर यांनी पंतप्रधान आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लाखांची मदत केली आहे. या मदतीमाग त्यांच्या शतकांचा आकडा दडलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी केंद्र व राज्य सरकारला मदत केली आहे.
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशातील अनेक क्रीडापटू पुढे आले आहेत. सचिन तेंडुलकर आणि सुरेश रैना यांनी अनुक्रमे 50 व 52 लाखांचा निधी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) 51 कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा केला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही गरिबांसाठी काम करत आहे आणि त्यानं 50 लाख किमतीचे तांदूळ दान केले. अजिंक्य रहाणे, मेरी कोम, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, हिमा दास आदी क्रीडापटूही पुढे आले आहेत. युवराज सिंगनेही 50 लाख दान केले आहेत.
गावस्कर यांनी 59 लाखांचे दान केले आहे. त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीत 35 लाख, तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 24 लाख दिले आहेत. त्यांनी दान केलेल्या रकमेमागे एक गुपित आहे. गावस्कर यांनी टीम इंडियाक़डून 34 कसोट आणि 1 वन डे शतक झळकावलं आहे. म्हणून त्यांनी केंद्राला 35 लाखांची मदत केली. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 22 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2 शतकं अशी 24 शतकं झळकावली आहे. त्यामुळे त्यांनी राज्य सरकारला 24 लाखांची मदत केली.
दरम्यान चेतेश्वर पुजारानेही मदत केली आहे.