कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) केंद्र सरकराला पूर्ण पाठींबा जाहीर केला आहे. बीसीसीआयनं पंतप्रधान सहाय्यता निधीत 51 कोटींची मदत जाहीर केली आणि आता लोकांमध्ये जनजागृतीसाठी बीसीसीआयनं एक व्हिडीओ तयार केला आहे.
या व्हिडीओत सर्व खेळाडू लोकांना मास्क घालण्याचं आवाहन करत आहेत. हे आवाहन करण्यासाठी बीसीसीआयनं हा खास व्हिडीओ तयार केला आहे. यावेळी बीसीसीआयनं टीम इंडियाचं नाव बदलून टीम मास्क फोर्स असं नाव ठेवलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं व्हिडीओत हे जाहीर केले.
या व्हिडीओत विराटसह बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, स्मृती मानधना, रोहित शर्मा, हरभजन सिंग, हरमनप्रीत कौर, वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड, मिताली राज आणि सचिन तेंडुलकर दिसत आहे. हे सर्व खेळाडू लोकांना घरच्या घरीच मास्क तयार करा आणि या मोहीमेत सहभागी व्हा, असं आवाहन करत आहेत. स्वतःच्या आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी हे मोठं योगदान आहे, असेही खेळाडूंनी म्हटलं आहे.
बीसीसीआयनं लिहीलं की,'' टीम इंडिया आता टीम मास्कफोर्स बनली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत साथ द्या. सेतू आरोग्य मोबाईल अॅप डाऊनलोड करा.''