नवी दिल्ली : देशात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. लसीकरणाचा वेग मंदावल्यामुळे रुग्णांच्या संख्येत कैकपटींनी वाढ होताना दिसते. आयपीहलचे आयोजन बायोबबलमध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत करण्यात येत आहे. करोनाच्या भीतीपोटी खेळाडू आणि अधिकाऱ्यांची माघार घेणे सुरू असताना आगामी टी-२० विश्वचषकाचे आयोजन करायचे कसे? असा प्रश्न बीसीसीआयला पडला आहे. अशावेळी हे आयोजन यूएईत हलविता येईल का, याची चाचपणी सुरू झाली आहे.
यंदा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. मात्र कोरोना स्थिती पाहता हे आयोजन संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआयने पर्याय शोधण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे महाव्यवस्थापक धीरज मल्होत्रा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
‘या स्पर्धेसाठी माझी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतात विश्वचषकाचे आयोजन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमचे कोरोना स्थितीवर लक्ष आहे. तसेच आम्ही यूएईत स्पर्धेचे आयोजन करण्याची रणनीती आखत आहोत. मात्र यावर बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल’, असे मल्होत्रा म्हणाले.मागच्या वर्षी बीसीसीआयने आयपीएल आयोजन यूएईत केले होते. एमिरेट्स क्रिकेट बोर्डासोबत सोबत करार करण्यात आला होता. त्यामुळे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे बीसीसीआयला वाटते.