दुबई : कोरोनामुळे मे महिन्यात स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा अडचणीत आली असून सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन बुधवारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली. मात्र, आयपीएलच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर नटराजनने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. कोरोनाबाधित आढळल्यानंतर नटराजनच्या संपर्कात आलेल्या सर्व सदस्यांना विलगीकरणात पाठविण्यात आले. यामध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या विजय शंकरचाही समावेश आहे.
संसर्ग झालाच कसा?- बीसीसीआयने कठोर बायो-बबल तयार केले असून प्रत्येक तीन दिवसांनी सर्व खेळाडू, स्टाफ आणि अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी होत आहे. कोणालाही बायो-बबलच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे नटराजनला कोरोनाची लागण कशी झाली, हाच मोठा प्रश्न आहे.- आरटी-पीसीआर चाचणीत टी. नटराजन कोरोनाबाधित आढळला. त्याला विलगीकरणात ठेवले आहे. उर्वरित सदस्यांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.