कोलकाता - गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणूने देशात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्याचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसताना दिसत आहे. देशातील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या रणजी करंडक स्पर्धेवरही कोरोनाचे सावट घोंगावू लागले असून, स्पर्धा सुरू होण्यास १० दिवस असतानाच बंगालच्या रणजी संघातील सात सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. रणजी करंडक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र तत्पूर्वीच मोठ्या प्रमाणात खेळाडू पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर मुंबईविरुद्ध होणारा दोन दिवसीय सराव सामना रद्द करण्यात आला आहे. तसेच मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबे आणि संघाचा एक व्हिडीओ अॅनॅलिस्ट यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दुबेच्या जागी साईराज पाटील याला संघाला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
रणजी करंडक स्पर्धेमध्ये बंगालचा समावेश विदर्भ, राजस्थान, केरळ, हरियाणा आणि त्रिपुरा यांच्यासोबत ब गटात करण्यात आला आहे. तसेच बंगालचा सलामीचा सामना १३ जानेवारीपासून बंगळुरूमध्ये त्रिपुराविरुद्ध खेळणार आहे. बंगाल क्रिकेट संघाचे सचिव स्नेहाशीष गांगुली यांनी सांगितले की, कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे बंगाल क्रिकेट संघाने खबरदारी म्हणून बंगालच्या सर्व क्रिकेटपटूंची आरटीपीसीआर चाचणी केली होती. त्यामध्ये काही खेळाडू पॉझिटिव्ह सापडले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या संघामधील सुदीप चटर्जी, अनुस्तुप मुजुमदार, काझी जुनैद सैफी, गीत पुरी, प्रदीप्त प्रमाणिक, सुरजीत यादव आणि सहाय्यक प्रशिक्षक सौराशिष लाहिडी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे सातही सदस्य रविवारी सॉल्ट लेक येथील जाधवपूर विद्यालयामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात खेळले होते. मात्र त्यांना कोरोनाता नेमका कोणता संसर्ग झाला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, सीएबीने कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व स्थानिक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पश्चिम बंगालमध्ये रविवारी कोरोनाचे ६ हजार १५३ रुग्ण सापडले होते. त्यामध्ये एकट्या कोलकातामध्ये ३ हजार १९४ रुग्ण सापडले होते.