दुबई : कोरोनामुळे यंदाची आयपीएल भारताबाहेर खेळविण्याचा निर्णय झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींना वेध लागले होते ते टी-२० क्रिकेटच्या धमाक्याचे. आयपीएलचे सर्व संघ काही दिवसांपूर्वीच यूएईमध्ये पोहोचल्यानंतर क्रिकेटप्रेमींची उत्सुकता ताणली गेली. मात्र आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) संघाच्या एका खेळाडूला आणि १२ स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने पुन्हा एकदा आयपीएलवर संकट निर्माण झाले आहे.
अद्याप सीएसके संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसून कोणत्या खेळाडूला कोरोना झाला आहे, हेही कळालेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार हा कोरोनाग्रस्त खेळाडू भारतीय वेगवान गोलंदाज आहे. सीएसके संघ २१ आॅगस्टला दुबई येथे पोहोचला होता आणि त्यानंतर संघाचे सर्व सदस्य ७ दिवसांसाठी क्वारंटाइन झाले होते.पूर्ण संघ क्वारंटाइनशुक्रवारपासूनच संघाचे सराव सत्र सुरू होणार होते, मात्र एक खेळाडू आणि १२ स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संघात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय आता सीएसके संघ पुन्हा एकदा क्वारंटाइन झाला आहे. तसेच शुक्रवारी सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून या सर्वांचा अहवाल शनिवारी समोर येईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.