लंडन : इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या मुख्य संघातील तीन खेळाडूंसह सात जण कोरोनाबाधित झाल्याने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेआधी यजमान संघाला मोठा धक्का बसला. मंगळवारी संपूर्ण संघ नव्याने निवडण्यास बाध्य व्हावे लागले. पाकिस्तानविरुद्ध मालिकेला ८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळले जातील. ४ ऑगस्टपासून भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्टलमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर इंग्लिश खेळाडूंची सोमवारी कोरोना चाचणी झाली. त्यात तीन खेळाडू आणि सहयोगी स्टाफमधील चार जण पॉझिटिव्ह आढळले. बाधित झालेल्यांपैकी कुणाचेही नाव पुढे आलेले नाही. संघातील अन्य सदस्यदेखील बाधितांच्या संपर्कात होते. रविवारपासून संपूर्ण सदस्य क्वारंटाईन होते, अशी माहिती ईसीबीने दिली. गुरुवारी पाकविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडेसाठी इंग्लंड संपूर्ण नवीन संघ खेळविणार आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स हा नेतृत्व करेल. इयोन मोर्गन नियमित कर्णधार आहे.
नऊ नव्या चेहऱ्यांचा समावेश- नव्या संघात नऊ चेहरे असे आहेत जे पहिल्यांदा राष्ट्रीय संघात खेळतील. श्रीलंकेविरुद्ध मालिकेदरम्यान सुटीवर गेलेले मुख्य कोच ख्रिस सिल्व्हरवूड यांचे संघात पुनरागमन होत आहे. मुख्य संघातील अनेक खेळाडू आता १६ जुलैपासून सुरू होत असलेल्या टी-२० मालिकेत खेळू शकतील. n ईसीबी संचालक ॲश्ले जाईल्स म्हणाले, ‘आम्हाला खबरदारी म्हणून खेळाडू आणी स्टाफ बदलावा लागला. यासाठी जी एकजूटता दाखविण्यात आली, त्याचा मला गर्व वाटतो. ईसीबी सीईओ टॉम हॅरिसन म्हणाले, ‘पॉझिटिव्ह असलेल्या अनेक खेळाडूंना लक्षणे नाहीत, मात्र त्यांना अस्वस्थ वाटते. डेल्टा प्रकाराचा धोका आणि बायोबबलमधील सूट यामुळे कोरोनाचा धोका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.’
क्वारंटाईन असलेला इंग्लंड संघइयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो (यष्टिरक्षक), टॉम बॅटन, सॅम बिलिंग्स (यष्टिरक्षक), जोस बटलर (यष्टिरक्षक), सॅम कुरेन, टॉम कुरेन, लियाम डॉसन, जॉर्ज गर्टन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रुट, जेसन रॉय, डेविड विली, क्रिस वोक्स, मार्क वूड आणि कोच पॉल कॉलिंगवूड.
इंग्लंडचा नवा संघबेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बॉल, डॅनी ब्रिग्स, ब्रायडेन कार्सी, जॅक क्राऊली, बेन डकेट, लेविस ग्रेगरी, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, शाकिब महमूद, डेविड मलान, क्रेग ओव्हर्टन, मॅट पार्किन्सन, डेव्हिड पेन, फिल साॅल्ट, जॉन सिम्पसन आणि जेम्स विन्स.
वन डे मालिकेसाठी पाकिस्तान संघबाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, आगा सलमान, फहीम अशरफ, फखर झमा, हैदर अली, हारिस रऊफ, हारिस सोहेल, हसन अली, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिजवान (यष्टिरक्षक), सरफराज अहमद (यष्टिरक्षक), सौद शकील, शाहीन शाह अफरीदी, सोहैब मकसूद, उस्मान कादीर.