नवी दिल्ली : कोरोनामुळे जगात सर्वत्र लॉकडाऊन आहे. क्रिकेट संचालन ठप्प झाले असून इंडियन प्रीमियर लीगचे १३ वे सत्रदेखील यंदा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यंदा आयपीएलचे आयोजन न झाल्यास भारतीय खेळाडूंची वेतनकपात शक्य असल्याचे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी शुक्रवारी दिले.
जगातील सर्वांत श्रीमंत बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला(बीसीसीआय) आयपीएल आयोजनाअभावी तब्बल ४ हजार कोटींचा फटका बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोरोनामुळे सामने आयोजन थांबले. प्रायोजक आणि प्रसारकांकडून आर्थिक लाभ होताना दिसत नसल्यामुळे अनेक देशांच्या क्रिकेट बोर्डानी खेळाडूंच्या वेतनकपातीचा निर्णय घेतला. बीसीसीआयने मात्र अद्याप खेळाडूंच्या कमाईला हात लावलेला नाही.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मात्र आयपीएल रद्द करावे लागल्यास बोर्डाला कपातीबाबत विचार करावाच लागेल, असे संकेत दिले.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले, ‘आम्हाला बोर्डाची आर्थिक स्थिती पाहावी लागेल. आमच्याकडे किती शिल्लक आहे, त्यानुसार पुढचे निर्णय घ्यावे लागतील. आयपीएल आयोजन न झाल्यास ४ हजार कोटींचे नुकसान हा मोठा फटका असेल.’
आयपीएल होणार नसेल तर खर्चाला कात्री म्हणून खेळाडूंच्या वेतनकपातीचा पर्याय असेल. आयपीएल झाल्यास खेळाडूंना नुकसान होणार नाही याची काळजी घेत खर्चाचा मार्ग निवडू.’
आयपीएलचे भविष्य सध्या अधांतरी आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता यंदा आयपीएल होइलच असे कुणी ठामपणे सांगू शकणार नाही.
बीसीसीआयने जानेवारीत केंद्रीय करार यादी जाहीर केली होती. त्यानुसार अ प्लस श्रेणीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू असून या तिघांच्या कराराची वार्षिक रक्कम ७ कोटी अशी आहे. अ श्रेणीत प्रत्येकी पाच कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येकी ३ कोटी आणि क श्रेणीच्या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रुपये दिले जातात. (वृत्तसंस्था)
Web Title: coronavirus: BCCI president Sourav Ganguly hints at players' pay cuts if IPL is canceled
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.