Corona Virus मुळे २१ वर्षीय फुटबॉल प्रशिक्षकाच्या मृत्यूची बातमी ताजी असताना इंग्लंडच्या क्रिकेटपटूला कोरोना झाल्याचे वृत्त मंगळवारी येऊन धडकले. इंग्लंडचा सलामीवीर ॲलेक्स हेल्स याच्या प्रकृतीत कोरोनाची लक्षणं आढळल्याने खळबळ उडाली. त्यामुळेच पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याची चर्चा दिवसभर रंगली. हेल्स मायदेशात परतला असून त्याने नुकतीच तेथून आपल्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स दिले.
कोरोना व्हायरसमुळे क्रीडा विश्वाला मंगळवारी मोठा धक्का बसला. स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सियाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अवघ्या २१ व्या वर्षी त्याला कोरोनामुळे मृत्यूला जवळ करावे लागले. त्यात परदेशी खेळाडूमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याच्या वृत्ताला पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वासीम खान यांनीही दुजोरा दिला. त्यामुळे क्रीडा विश्वात आणखी चिंतेचे वातावरण पसरले.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी हेल्सच्या नावाचा उल्लेख केला. पाकिस्तान सुपर लीगमध्ये हेल्सनं ७ सामन्यांत ५९.७५च्या सरासरीनं २३९ धावा केल्या आहेत. पण मायदेशातून हेल्सने अपडेट्स दिले आहेत. तो म्हणाला," सोशल मीडियावर माझ्याबद्दल बऱ्याच अफवा फिरत आहेत आणि मला त्यावर स्पष्टीकरण द्यायचे आहे. अन्य परदेशी खेळाडूंप्रमाणे मीही पाकिस्तान सुपरलीग सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. कुठेतरी अडकून राहण्यापेक्षा कुटुंबीयांसोबत राहणे मी महत्त्वाचे मानले. शनिवारी मी मायदेशात परतलो. मी पूर्णपणे तंदुरुस्त होतो. पण, रविवारी मला ताप आला होता आणि त्यावेळी मी स्वतःला सर्वांपासून वेगळे ठेवून, सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे. सध्यातरी कोरोनाची लक्षणं दिसत नाहित."