कराची - कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने सध्या जगाची चिंता वाढवली आहे. दरम्यान, नुकत्याच पूर्वपदावर येत असलेल्या क्रीडा जगतावरही कोरोनाची छाया पडली असून, क्रिकेटसह अन्य खेळांमधील खेळाडूंनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघालाही कोरोनाचा विळखा पडला असून, संघातील तीन प्रमुख खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
वेस्ट इंडिजचा संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला आहे. दरम्यान, पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजच्या संघातील तीन खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने दिली आहे. वेस्ट इंडिजच्या रॉस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल आणि काइल मायर्स यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे तिघेही मालिकेला मुकणार असून, सध्या त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका सोमवार १३ डिसेंबरपासून कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे.पाकिस्तान क्रिकेटसाठी वेस्ट इंडिजचा दौरा खूप महत्त्वपूर्ण आहे. टी-२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा संघही पाकिस्तानच्या दौऱ्यावर आला होता. मात्र सुरक्षा विषयक कारणांचा हवाला देऊन दौरा अर्ध्यावरच सोडून वेस्ट इंडिजचा संघ मायदेशी परतला होता. त्यानंतर इंग्लंडनेसुद्धा पाकिस्तान दौऱ्यावर येण्सा नकार दिला होता. दरम्यान, आता वेस्ट इंडिजचा संघ पाकिस्तान दौऱ्यासाठी तयार झाला. मात्र त्यांच्या संघावर कोरोनाचा अॅटॅक झाल्याने या मालिकेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
वेस्ट इंडिजच्या पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक
१३ डिसेंबर, पहिला टी-२० सामना, कराची
१४ डिसेंबर, दुसरा टी-२० सामना, कराची
१६ डिसेंबर, तिसरा टी-२० सामना, कराची
१८ डिसेंबर, पहिला वनडे, कराची
२० डिसेंबर, दुसरा वनडे, कराची
२२ डिसेंबर, तिसरा वनडे, कराची
Web Title: Coronavirus: Corona beats West Indies on Pakistan tour, three players positive
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.