नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या प्रादुभार्वामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. अशा स्थितीत आधी देश महत्त्वाचा आहे. आयपीएल आयोजनावर नंतर कधी तरी मतप्रदर्शन करता येईल. देश जिथल्या तिथे थांबला असताना आयपीएलसंदर्भात कुणीही बोलायला नको, असे मत भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने शुक्रवारी व्यक्त केले आहे.
जखमेमुळे दोन महिने क्रिकेटपासून दूर राहिलेल्या रोहितला आयपीएलच्या माध्यमातून राष्टÑीय संघात पुनरागमन करायचे होते. २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीशी सामना करण्यासाठी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयपीएलच्या तेराव्या पर्वाचे भवितव्य आता अधांतरी आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलने इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट दरम्यान रोहित शर्माला आयपीएलच्या भवितव्याबद्दल प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना रोहितने चहलला महत्त्वाचा सल्ला दिला.
माझ्या मते, ‘आपण सर्वात आधी देशाचा विचार करायला हवा. सर्वात आधी परिस्थिती नियंत्रणात येणं गरजेचं आहे, त्यानंतर आपण आयपीएलबद्दल बोलू शकतो.’ रोहितने आयपीएलच्या भवितव्याबद्दल आपलं मत मांडलं. देशभरात सध्या कोरोनाचे अनेक रुग्ण सापडले आहेत. वैद्यकीय यंत्रणा त्यांच्यावर उपचार करत आहेत. राज्यात मुंबई, पुणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्येही कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत.
रोहित पुढे म्हणाला, ‘सर्वात आधी देशाचा विचार व्हावा. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर आयपीएलचा विचार करता येईल. आयुष्याची चाके थांबली असताना कोरोनावर नियंत्रण मिळविण्याची धडपड सुरू आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या ७२५ वर पोहोचली. १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जगात मरणाऱ्यांची संख्या २२ हजारांवर गेली असून भारत बंदमुळे अनेक महानगरांतील जनजीवन ढवळून निघाले आहे. मी अशी मुंबई कधीही पाहिलेली नाही. क्रिकेटपटू या नात्याने आम्हाला नेहमी बाहेर राहावे लागते. सध्या विपरीत परिस्थिती असली तरी कुटुंबीयांसोबत वेळ घालवायला मिळत आहे, असे रोहितने म्हटले आहे. रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार असून भारतीय वन डे संघाचा उपकर्णधार आहे.
(वृत्तसंस्था)
Web Title: CoronaVirus: Country matters, after discussion on IPL - Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.