Join us  

CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये ‘गब्बर’ धवन धुतोय कपडे

Coronavirus : विषय कोणताही असो, त्यावर मजेशीर पोस्ट तयार करण्यात मीमर्स सदैव तयार असतात. आत्ताची या लॉकडाऊनच्या काळामध्ये दररोज सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरसपेक्षाही अधिक वेगाने व्हायरल होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 3:46 AM

Open in App

मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर संपूर्ण देश तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर सर्वांची झोपच उडाली. जगभरात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या थैमानाने सर्वच देशांचे व्यवहार जवळपास थांबले आहेत. अशातच २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरी बसून करायचे काय? असा प्रश्न देशवासीयांना पडला असला. असे असले तरी सोशल मीडियावर दरवेळी अ‍ॅक्टिव्ह असलेल्या मीमर्सना मात्र यामुळे दररोज नवनवे विषय मिळत आहे. क्रीडा विश्वही सध्या कोरोनामुळे थांबले असल्याने अनेक खेळाडू सोशल मीडियावर वेळ घालवत आहेत. यामध्ये कपडे धुतानाचा भारताचा सलामीवीर शिखर धवन याचा व्हिडिओ तुफान गाजतोय.विषय कोणताही असो, त्यावर मजेशीर पोस्ट तयार करण्यात मीमर्स सदैव तयार असतात. आत्ताची या लॉकडाऊनच्या काळामध्ये दररोज सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरसपेक्षाही अधिक वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते ‘गब्बर’ शिखर धवन याने. सराव बंद, फलंदाजी बंद, मैदानी व्यायाम बंद एकूणच सर्वकाही बंद झाल्याने घरी बसून करायचे काय, यावर धवनने मजेशीर उत्तर दिले आहे. त्याने एक धमाल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केली असून यामध्ये तो चक्क कपडे धुताना दिसतोय. इतकेच नाही, तर त्याची पत्नी फोनवर गप्पा मारत असून ती धवनला कपडे धुण्याविषयी ‘मार्गदर्शन’ही करताना दिसते. धवनच्या या मजेशीर पोस्टवर टेनिसस्टार सानिया मिर्झासह अनेक खेळाडूंनी ‘लाईक्स’ ठोकले आहेत.या शिवाय फलंदाज केदार जाधवही मीमर्ससाठी मोठा खेळाडू ठरत आहे. गेल्याच वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान महाराष्ट्रात पावसाचे कोणतेही चिन्हे नव्हती.एकीकडे महाराष्ट्राचा शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असताना, दुसरीकडे त्याचदरम्यान इंग्लंडमध्ये धो-धो पाऊस कोसळत होता. त्यामुळेच यादरम्यान केदारने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो पावसाला महाराष्ट्रात जाण्याची विनंती करताना दिसला.योगायोग म्हणजे त्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊसही पडला आणि यावेळी पुन्हा एकदा जागे झालेल्या मीमर्सनी हा पाऊस थांबविण्यासाठी केदारलाच विनंती करण्याचे मजेशीर आवाहन केले होते. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठीही पुन्हा एकदा मीमर्सना आपल्या केदारची आठवण आली असून ‘केदार भावा पुन्हा एकदा हे संकट दूर करण्यासाठी तूच विनंती कर,’ अशी मजेशीर पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहे.जेव्हा पोलीस जिंकतात नाणेफेकदेश लॉकडाऊन असला, तरी काही उत्साही लोक विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा उत्साही खेळाडूंना ‘धावबाद’ करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलिसांनी आपल्या काठीचा चांगलाचा वापर केला आहे. विनाकारण बाहेर पडलेल्यांना सध्या पोलिसांच्या लाठीमाराचा प्रसाद खावा लागत आहे. यामुळे पोलिसांचीही चौफेर फटकेबाजी सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळेच मीमर्सची मजेशीर पोस्ट व्हायरल होत आहे की, ‘महाराष्ट्र पोलिसांनी नाणेफेक जिंकली असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.’ पण पोलिसांची ही फलंदाजी लॉकडाऊन असेपर्यंत सुरू राहण्याची चिन्हे असल्याने विनाकारण घराबाहेर पडताना विचार करा.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या