नवी दिल्ली : कोरोनावर मात केल्यानंतर खेळाडू मैदानावर परत येतील तेव्हा आनंद साजरा करण्याच्या नव्या संकल्पना रुजू होतील, अशी कल्पना भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने मांडली आहे. खेळाडू यापुढे हस्तांदोलन करण्याऐवजी नमस्कार करतील आणि हवेत हात उंचावून आनंद साजरा करतील, असे अजिंक्यला वाटते.
ऑनलाईन पत्रकार परिषदेत बुधवारी बोलताना रहाणे म्हणाला, ‘कोरोनानंतर सवसाधारण जीवनशैली बदलणार असून क्रिकेटदेखील यापासून अलिप्त राहणार नाही. मैदानावर खेळाडूंना आधीच्या तुलनेत अधिक शिस्तीत राहावे लागेल. फिजिकल डिस्टन्स पाळावे लागेल. गडी बाद केल्यानंतर कदाचित यापुढे हस्तांदोलनऐवजी नमस्कारचा वापर होईल. कुठलीही गोष्ट सहजपणे घेता येणार नाही. गडी बाद केला की आपल्या जागीच राहून टाळी वाजवून आनंद उपभोगता येणार आहे. यापुढे नमस्कार किंवा हाय फाईव्ह (हवेत हात उंचावणे) इतकेच करणे शक्य होणार आहे.’ क्रीडा मंत्रालयाने आॅलिम्पिकसाठी राष्टÑीय शिबिरांचे आयोजन करण्याची योजना आखली आहे. बीसीसीआयने मात्र अद्याप अशा प्रकारची कुठलीही योजना आखलेली नाही. रहाणे मात्र लॉकडाऊनमध्ये स्वत:च्या फिटनेसवर लक्ष देत आहे.
खेळाडू म्हणून मैदानात जाण्याआधी किती आव्हान असते असे विचारताच तो म्हणाला, ‘यासाठी किमान तीन ते चार आठवडे कठोर सराव हवा असतो.’ ६५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळणारा रहाणे पुढे म्हणाला, ‘स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याआधी कुठल्याही खेळाडूला किमान तीन-चार आठवडे तयारी करायला हवी. मी घरच्याघरी फिटनेसवर लक्ष देत आहे. त्यासाठी योग, ध्यानसाधना, कराटे आदींचा सराव करतो. ट्रेनरने आखून दिलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करतो. सराव सुरू नसल्याने फलंदाजीची उणीव भासत आहे.’