- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लोकमतगेल्या काही दिवसांपासून आयपीएल होणार की नाही, हाच प्रश्न सर्व क्रिकेटप्रेमींना भेडसावत आहे. त्याचप्रमाणे यंदा ऑस्ट्रेलियात होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धाही होणार की नाही, याबाबत ठामपणे काही सांगता येत नाही. पण या सर्व चर्चांमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. या स्पर्धेला गेल्या वर्षी सुरुवात झाली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना २०२१ साली लॉर्ड्स येथे होणार आहे; मात्र आता पहिल्यांदाच होत असलेल्या या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवरही संकट आल्याचे पाहण्यास मिळत आहे. जर खरेच असे झाले, तर नक्कीच ही अत्यंत निराशाजनक बाब ठरेल. कारण या स्पर्धेसाठी आर्थिकरीत्या खर्च झालेलाच आहे. परंतु त्याचबरोबर बौद्धिक मेहनतही मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आली आहे. शिवाय या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकांची कारकीर्द अवलंबून आहे.सध्या कोरोनामुळे कुठेही क्रिकेट सामने सुरू नाहीत. त्याचबरोबर पाकिस्तानसारख्या काही देशांनी पुन्हा एकदा या स्पर्धेचे सामने खेळवावेत, अशी मागणी केली आहे. याचे कारण त्यांनी दिले आहे की, प्रत्येक संघाला समान संधी मिळालेली नाही. गुणतालिकेवर नजर टाकल्यास भारत अव्वल असून त्यांनी ९ सामन्यांतून ३६० गुण मिळवले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील आॅस्टेÑलियाने २९६ गुण मिळवले असून, त्यांनी ३ मालिकेतून १० सामने खेळले आहेत. त्यानंतर न्यूझीलंडने ३ मालिकेतून ७ सामने खेळताना १८० गुण मिळवले आहेत. त्यानंतर तळाच्या स्थानावर नजर टाकल्यास कळेल की, पाकिस्तानने दोन मालिकेतून पाच सामने खेळले असून श्रीलंकेने २ मालिकेतून चार सामने, तर वेस्ट इंडिजने एकच मालिका खेळली, तर द. आफ्रिकेने दोन मालिका खेळल्या असून बांगलादेशनेही एकच मालिका खेळली आहे. त्यामुळे जे तळाचे संघ आहेत ते या प्रणालीवर नाराज आहेत. त्यामुळेच आयसीसीच्या बैठकीत ही स्पर्धा पुन्हा खेळविण्यात यावी किंवा ही स्पर्धाच रद्द करावी, यावर मोठा वाद उद्भवू शकतो. जागतिक स्पर्धेचा अर्थ म्हणजे प्रत्येकाला समान संधी मिळावी, पण तसे होताना दिसले नाही. असे नाही की सर्वांना समान सामने खेळण्यास मिळत नाहीत, परंतु होम आणि अवे सामन्यांचे संतुलन राखण्यात आले पाहिजे होते. प्रत्येक मालिकेत सामन्यांची संख्या समान ठेवली पाहिजे होती. त्यामुळे एकूणच या स्पर्धेचे स्वरूप तांत्रिकदृष्ट्या अत्यंत किचकट होते. सध्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास भारत आणि आॅस्टेÑलिया यांचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. जर यंदा एकही सामना झाला नाही, तर पुढील वर्षी बाकीचे संघ किती सामने खेळणार, हाही एक प्रश्नच आहे. त्यामुळेच बाकीच्या संघांसाठी ही स्थिती अडचणीची आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानसह इतर बोर्डांनी केलेला प्रश्न मला योग्य वाटतो. माझ्या मते, या स्पर्धेची कल्पना रद्द न करता या स्पर्धेसाठी नव्या स्वरूपाची मांडणी करण्यात आली पाहिजे. कारण कसोटी सामन्यांची जागतिक स्पर्धा ही संकल्पनाच शानदार आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवरही आले संकट
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवरही आले संकट
या स्पर्धेसाठी आर्थिकरीत्या खर्च झालेलाच आहे. परंतु त्याचबरोबर बौद्धिक मेहनतही मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आली आहे. शिवाय या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळाडू आणि प्रशिक्षकांची कारकीर्द अवलंबून आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:09 PM