मुंबई : रणजी करंडक सामन्यांसाठी खेळाडूंना देशांतर्गत प्रवास करणे सुरक्षित झाल्यानंतरच स्थानिक सत्र सुरू करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली.स्थानिक क्रिकेटबाबत अनिश्चितता कायम असताना गांगुली यांनी हे वक्तव्य केले. कोरोनामुळे आयपीएलचे आयोजन यंदा आॅक्टोबरमध्ये झाल्यास त्याचा परिणाम स्थानिक क्रिकेटवर होईल. यंदा सामन्यांची संख्या कमी करावी लागणार आहे. यंदा स्थानिक सत्र २०२०-२०२१ आॅगस्टअखेर विजय हजारे करंडक स्पर्धेद्वारे होणार होते. त्यानंतर रणजी करंडक, दुलिप करंडक आणि सय्यद मुश्ताक अली करंडकाचे आयोजन होते. मागच्या सत्रात लॉकडाऊन सुरू होताच इराणी करंडकाचा सामनादेखील रद्द करण्यात आला. स्थानिक आणि ज्युनियर क्रिकेटबाबत विचारताच ‘स्पोर्ट्स तक’शी बोलताना गांगुली म्हणाले, ‘स्थानिक क्रिकेट सत्र महत्त्वपूर्ण असले तरी कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतरच शक्य होणार आहे. ज्युनियर क्रिकेटचे आयोजन तर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच होऊ शकेल. भारतासारख्या मोठ्या देशात सामन्यांसाठी संघांना एका स्थानाहून दुसऱ्या स्थानासाठी प्रवास करावा लागतो. त्यामुळेच प्रवास सुरक्षित होईपर्यंत स्थानिक क्रिकेट सुरू करणे योग्य होणार नाही.’‘आम्ही युवा खेळाडूंबाबत जोखीम पत्करू इच्छित नाही.भारतासारख्या मोठ्या देशात खेळाडू आणि संघांना प्रवास करावा लागतो. कुमार गटाच्या सामन्यांमध्ये अधिक जोखीम असते. वातावरण सुरक्षित झाल्याखेरीज क्रिकेट सुरू करणे शक्य नाही,’ असे गांगुली म्हणाले. आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार खेळ सुरू होतील. सध्या कोरोनाचा प्रकोप वाढतच असून गुरुवारी २४,८७९ रुग्ण आढळले आहेत. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- coronavirus: प्रवास सुरक्षित झाल्यानंतरच स्थानिक क्रिकेट आयोजनाचा विचार
coronavirus: प्रवास सुरक्षित झाल्यानंतरच स्थानिक क्रिकेट आयोजनाचा विचार
कोरोनामुळे आयपीएलचे आयोजन यंदा आॅक्टोबरमध्ये झाल्यास त्याचा परिणाम स्थानिक क्रिकेटवर होईल. यंदा सामन्यांची संख्या कमी करावी लागणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 3:19 AM