झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू आहे. देशातील विविध शहरात कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, खबरदारी म्हणून अनेक उपाय अवलंबण्यात येत आहेत. कोरोनामुळे जगभरातील अनेक स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन-डे मालिका, आयपीएल या स्पर्धांना देखील कोरोनाचा फटका बसला आहे.
कोरोना आजाराचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपययाोजना करण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विरोट कोहलीनेही ट्विटरद्वारे खंबीर राहा, योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाविरुद्ध लढा देऊ असा संदेश देखील कोहलीने दिला आहे.
बीसीसीआयनेआयपीएलचे सामने 29 मार्च ऐवजी 15 एप्रिलपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आम्ही आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याबाबत म्हणाले की, सध्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा एकमेव पर्याय योग्य होता. तसेच खेळाडूंनी सुरक्षित राहणं हे सर्वात महत्वाचे असल्याचे सांगितले. तसेच आगामी काही दिवसात काय घडामोडी घडतील यावरुन आयपीएलचे भवितव्य ठरणार आहे असं सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, देशात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 80 हून अधिक आहे. यामध्ये 17 परदेशी नागरिक आहेत. महाराष्ट्रात 19 जणांनी कोरोनाची बाधा झाली आहे. तर केरळमध्ये 22, हरयाणात 15, उत्तर प्रदेशात 11, कर्नाटकात 7, राजस्थान, लडाखमध्ये प्रत्येकी 3, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.