नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीवर नियंत्रण मिळविल्यानंतर क्रिकेट रिकाम्या स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खेळाडूंच्या उत्साहावर परिणाम होणार नाही, पण माहोलची मात्र निश्चितच उणीव भासेल, असे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
जगभरातील क्रिकेट बोर्ड रिकाम्या स्टेडियममध्ये सामने आयोजित करण्याच्या पर्यायाचा विचार करीत आहेत. आॅस्ट्रेलियात टी-२० विश्वकप स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रेक्षकांना स्टेडियमपासून दूर ठेवल्या जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. सध्या कोरोना महामारीमुळे या स्पर्धेच्या आयोजनाबाबतही साशंकता आहे.
कोहली म्हणाला, ‘हे शक्य आहे. कदाचित असेच होईल. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास कोण याचा कसा विचार करतो, याची मला कल्पना नाही. कारण आम्हाला सर्वांना चाहत्यांच्या साक्षीने खेळण्याची सवय झाली आहे. सामने पूर्ण जोशाने खेळले जातील, याची मला कल्पना आहे, पण प्रेक्षकांच्या चीअरअपमुळे खेळाडूंचा जो उत्साह वाढतो, सामन्यादरम्यान जो तणाव असतो तो स्टेडियममध्ये उपस्थित प्रत्येक चाहत्याला जाणवतो. ती भावना आणणे कठीण होईल.’
कोहली पुढे म्हणाला, ‘मैदानावर अनेक घटना यामुळे घडल्या की प्रेक्षकांनी उत्साह निर्माण केला. त्याची आता नक्की उणीव भासेल. क्रिकेट चालत राहील, पण जो माहोल स्टेडियममध्ये निर्माण होतो त्याची उणीव राहील. ’ जोस बटलर, बेन स्टोक्स, जेसन रॉय व पॅट कमिन्स यांच्यासारख्या खेळाडूंनी रिकाम्या स्टेडियममध्ये खेळण्याच्या विचाराचे समर्थन केले होते. दरम्यान, महान आॅस्ट्रेलियन खेळाडू अॅलन बॉर्डरनी म्हटले होते की, प्रेक्षकांविना विश्वकप स्पर्धेचे यजमानपद योग्य ठरणार नाही. एक अन्य आॅस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल व काही अन्य क्रिकेटपटूंनीही असेच मत व्यक्त केले आहे.