भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात देशात जगातील लोकप्रिय टी-३० लीग म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएल स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही बीसीसीआयनं आयपीएल अद्याप रद्द होऊ दिलेली नाही आणि सर्व परदेशी खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी देखील घेतली आहे. (Coronavirus News Australian Cricket Board helps India in Corona fight)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) नेहमीच दबदबा राहिला आहे. अडचणीच्या काळात बीसीसीआय इतर क्रिकेट बोर्डांच्या मदतीला धावून गेलं आहे. आता भारत संकटात असताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं मदतीचा हात पुढे केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्श असोसिएशन आणि यूनिसेफ ऑस्ट्रेलियाकडून भारताला कोरोना लढ्यात सहकार्य म्हणून आर्थिक मदत जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं प्रारंभिक रुपात ५० हजार डॉलर म्हणजेच जवळपास ३७ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड ऑस्ट्रेलियातील नागरिकांना मदतीचं आवाहन देखील करणार आहे. "ऑस्ट्रेलिया आणि भारताचं एक वेगळं नातं आहे. क्रिकेटमुळे दोन्ही देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही भारतासोबत आहोत. शक्य तितकी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि येथील नागरिकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत", असं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अंतरिम सीईओ निक हॉकले म्हणाले.
दरम्यान, भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये सहभागी असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटूंनीही मदतीची घोषणा याआधीच केली आहे. यात कोलकाता नाइट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, समालोचक आणि माजी ऑस्ट्रेलियाई गोलंदाज ब्रेट ली यांचा समावेश आहे.
Web Title: Coronavirus News Australian Cricket Board helps India in Corona fight
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.